Home विदर्भ अखेर टेमनी येथील दलित वस्ती रस्ता बांधकामाची चौकशी सुरू

अखेर टेमनी येथील दलित वस्ती रस्ता बांधकामाची चौकशी सुरू

0

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी घेतली दखल

गोंदिया/देवेंद्र रामटेके(ता.21) दीड वर्षापूर्वी तालुक्यातील टेमनी येथील ग्रामपंचायत प्रशासनाने दलित वस्तीसुधार योजने अंतर्गत मंजूर झालेला रस्ता दलित वस्तीत न बनविता तो गैर दलित वस्तीत बनविला, अशी तक्रार येथील एका ग्रामपंचायत सदस्याने जिल्हा प्रशासनाकडे केली होती. अखेर या प्रकरणाची दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी चौकशी सुरू केली आहे. सदर रस्ता बांधकामाची चौकशी सुरू झाल्यामुळे कारवाईच्या भीतीने ग्रामसेवक व कनिष्ठ अभियंता यांचे धाबे दणाणले आहे.
वर्ष 2018 -19 मध्ये येथील दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत जवळपास तीन लक्ष रुपयांचा देवानंद गेडाम ते मोरपंत भालाधरे यांच्या घरापर्यंत असलेल्या दलित वस्तीत सिमेंट रस्ता बांधकाम नियोजित केला होता. तसा ठरावही ग्रामपंचायत तर्फे घेण्यात आला. हे विशेष. परंतु प्रत्यक्षात रस्ता बांधकाम करतानी सदर रस्ता मंजूर झालेल्या ठिकाणी न बनविता तो गैरदलित वस्तीत बनविण्यात आला. अशी तक्रार येथील ग्रामपंचायत सदस्य विनोद भुराजी मेश्राम यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली. या तक्रारीला दीड वर्षापेक्षा जास्त काळ लोटला तरी या प्रकरणाची कोणतीही चौकशी झाली नाही. अखेर नव्यानेच आलेले जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील यांनी कारवाईचा दणका दाखवीत या प्रकरणाची चौकशीला आरंभ केला. प्रकरणाची चौकशी सुरू झाल्यामुळे यातील दोषी अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. सदर रस्त्याचे बांधकाम ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने येथील उपसरपंच शिवलाल नेवारे यांनीच केल्याची बाब समोर आली आहे.त्यामुळे अधिकारी व कंत्राटदार यांच्यात आर्थिक साटेलोटे होण्याची शक्यता नाकारता येत नाही. येथील ग्रामपंचायत प्रशासनाची अधिक चौकशी केली असता अनेक भोंगळ कारभार चव्हाट्यावर येण्याची शक्यता गावकऱ्यां तर्फे वर्तविली जात आहे.आता मुख्य कार्यकारी अधिकारी दोषी अधिकाऱ्यांवर कोणती कारवाई करतात की त्यांना निर्दोष सोडतात हे होणाऱ्या चौकशीतूनच निष्पन्न होणार आहे.

प्रतिक्रिया—विनोद मेश्राम सदर रस्ता बांधकाम हा गैर दलित वस्तीत बनविण्यात आला. हा दलित समाजावर झालेला अन्याय आहे. त्यामुळे या प्रकरणी कारवाई होणे गरजेचे आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version