पुलांचे बांधकाम दर्जेदार करा- पालकमंत्री

0
58

• पालकमंत्र्यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन

• ११ कोटींची कामे

गोंदिया,दि.12 : रस्त्यांचे जाळे हा विकासाचा महत्वाचा घटक असून ग्रामीण भागाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी रस्ते व पूल महत्वाची भूमिका बजावतात. ही सगळी कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करा अशा सूचना पालकमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी बांधकाम विभागाला दिल्या.

मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत सडक अर्जुनी तालुक्यातील ११ कोटींच्या विविध पुलाच्या विकास कामांचे भूमीपूजन राज्यमंत्री, नगरविकास, ऊर्जा, आदिवासी विकास, उच्च व तंत्रशिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, महाराष्ट्र राज्य तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

आमदार मनोहर चंद्रिकापूरे, माजी आमदार राजेंद्र जैन, जिल्हा परिषद सदस्य सुधा रहांगडाले, जि.प. सदस्य निशा तोडासे, पंचायत समिती सदस्य संगीता खोब्रागडे, पंचायत समिती सदस्य निशा काशिवार, डॉ. रुचिराम वाढई, सहायक अभियंता संचित शिंदे, कनिष्ठ अभियंता मो. शफीउद्दीन, सीतेपार सरपंच सविता पारधी, सरपंच कोसमतोंडी महेंद्र पशीने, उपसरपंच अस्विनी काशिवार, खोडशिवणी सरपंच उर्मिला कंगाले, उपसरपंच टेकराम परशुरामकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गंगाधर परशुरामकर यावेळी उपस्थित होते.

पांढरी सीतेपार कोसमतोंडी नदीवरील पुलाचे भूमीपूजन पालकमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या हस्ते करण्यात आले. कोसमतोंडी-बोळुंदा नदीवर बांधण्यात येणाऱ्या पुलाचे भूमीपूजन करण्यात आले. गिरोला-खोडशिवनी-खजरी या मार्गावरील पुलाचे भूमीपूजन पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. ही सगळी कामे ११ कोटी रुपयांची आहेत.

भारनियमन कमी करण्यासाठी सरकार प्रामाणिक प्रयत्न करत आहे. आदिवासी भागातील बांधवांसाठी मोठ्या प्रमाणात योजना राबविण्यात येतील असे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले. तळागाळातील व शेवटच्या माणसाला न्याय देण्याचा आमचा प्रयत्न आहे. दीन दलित कष्टकरी समाजाला न्याय देण्यासाठी महाविकास आघाडी सरकार वचनबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात चांगले दर्जेदार रस्ते निर्माण करण्यात येतील. यासाठी लवकरच आराखडा तयार करण्यात येईल असे पालकमंत्री म्हणाले.

सन २०२२-२३ मध्ये या विभागासाठी कोट्यवधी रुपयांची विकास कामे मंजूर करण्यात आली असून या भागात रस्त्यांचे जाळे निर्माण करण्यात येणार आहे असे आमदार मनोहर चंद्रिकापूरे यांनी सांगितले. अर्जुनी मोरगाव-सडक अर्जुनी या तालुक्यात साखर कारखाना सुरू करावा. आम्ही या भागात मोठ्या प्रमाणात ऊस उत्पादन करू असे श्री. चंद्रिकापूरे यांनी सांगितले.