सामाजिक समता कार्यक्रम विकासाच्या प्रवाहात येण्यासाठी शिक्षण हे प्रभावी माध्यम-   आ. अॅड. किरणराव सरनाईक 

0
14
वाशिम, दि.१४ – वाशिम हा आकांक्षीत जिल्हा आहे. सर्वांनी समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांची माहिती जाणून घेतली पाहिजे.समाज कल्याण विभागाच्या कोणत्या योजनेचा आपल्याला लाभ घेता येईल याचा अभ्यास करून त्या योजनेचा लाभ घ्यावा.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी अहोरात्र मेहनत घेऊन शिक्षण घेतले शिक्षण हा मूलभूत कायदा आहे. विकासाच्या प्रवाहात येण्यासाठी शिक्षण हे प्रभावी माध्यम आहे.असे प्रतिपादन विधान परिषद सदस्य आमदार अॅड.
किरणराव सरनाईक यांनी केले.
            भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रमांतर्गत आज १४ एप्रिल रोजी सामाजिक न्याय भवन येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी शेतकऱ्यांसाठी केलेल्या कार्याबद्दलच्या व्याख्यानाचे उद्घाटक म्हणून अॅड. सरनाईक बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष एल.बी. राऊत हे होते.प्रमुख अतिथी म्हणून डॉ.महेंद्र भगत,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, जि.प.चे कृषी अधिकारी श्री.गिरी, कृषी तंत्र अधिकारी दिलीप कंकाळ, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त मारोती वाठ यांची उपस्थिती होती.
      आ.सरनाईक पुढे म्हणाले, डॉ आंबेडकरांनी राज्यघटनेच्या माध्यमातून स्वातंत्र्य,समता आणि बंधुता ही त्रिसूत्री जगाला दिलेली देणगी आहे.जिल्हा जात पडताळणी प्रमाणपत्र समितीच्यावतीने ५०१ विद्यार्थ्यांना ऑनलाईन जात पडताळणी प्रमाणपत्राचे केलेले वितरण ही बाब अत्यंत गौरवास्पद असल्याचे त्यांनी सांगीतले.
              डॉ. भगत म्हणाले,महात्मा फुले,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशासाठी खुप मोलाचे कार्य केले आहे.क्रांतीसुर्य महात्मा फुले यांनी शेतकऱ्याचा आसूड या ग्रंथात शेतकऱ्यांच्या दयनीय अवस्थेचे वर्णन केले आहे. पारंपारिक शेती न करता वैज्ञानिक दृष्टिकोन समोर ठेवून शेतीचे नियोजन करावे.आजच्या स्थितीत शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाच्या विविध योजना आहेत.सामूहिक शेतीतून उत्पादकता वाढविणे आवश्यक आहे.त्यासाठी योग्य ते नियोजन करावे.शेतीला व्यवसाय म्हणून बघितले पाहिजे.महामानवांची ग्रंथसंपदा वाचून त्यांचे विचार अंगीकारावेत,असे ते म्हणाले.
       श्री.तोटावार यांनी शेतकऱ्यांसाठी असलेल्या योजनांची माहिती दिली. यावेळी त्यांनी महाडीबीटी पोर्टलच्या कार्यपद्धतीबाबत विस्तृत सांगितले. शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीकडे वळावे.सेंद्रिय खतांचा वापर करावा. सिंचनासाठी सुयोग्य नियोजन व तंत्रज्ञानाचा वापर करुन भरघोस उत्पादन कसे मिळवावे व शेतीपूरक जोड व्यवसाय कसे करावेत याबाबतची माहिती दिली.
        श्री.गीरी यांनी कृषि विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली.कृषि विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना,तसेच ठिबक, तुषार सिंचन,शेडनेट पॉली हाऊस, संरक्षक शेती,एकात्मिक फलोत्पादन अभियान कार्यक्रमाची माहिती दिली.
        प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन महापुरुषांच्या प्रतिमेचे पुजन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी कलावंत के.के.डाखोरे यांनी गीत सादरीकरण केले.
        प्रास्ताविक बार्टीचे जिल्हा प्रकल्प अधिकारी वसंत गव्हाळे यांनी केले. संचालन यु.एस जमदाडे यांनी तर आभार हरीष वानखेडे यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राहुल चोंडकर,विजय भगत,गोविंद उगले, श्रीमती आर.एन.साठे, एस.एम.निमन तसेच समाज कल्याण विभागातील सर्व कर्मचारी, ब्रिक्स इंडिया प्रा.लि.चे जिल्हा व्यवस्थापक अनिल गायकवाड यांनी सहकार्य केले.कार्यक्रमाला नागरीकांची मोठया संख्येने उपस्थिती होती.