24 एप्रिल ते 1 मे दरम्यान किसान भागीदारी प्राथमिकता हमारी

0
17
  • ९३ हजार शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड देण्यासाठी बँकांचा पुढाकार
  • २४ एप्रिल रोजी किसान क्रेडिट कार्डसाठी विशेष ग्रामसभा

         वाशिम, दि. 21 : देशात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या सर्व पात्र शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करुन देण्याची मोहिम ६ फेब्रुवारी २०२० पासून सुरु केली आहे. ही मोहिम भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्षातंर्गत आत्मनिर्भर भारताचा एक भाग म्हणून देशात राबविण्यात येत आहे. केंद्र सरकार २४ एप्रिल ते १ मे २०२२ दरम्यान “ किसान भागीदारी प्राथमिकता हमारी ” ही मोहिम राबविणार आहे. जिल्हयात पी.एम. किसान सन्मानचे १ लाख ९९ हजार ६८३ लाभार्थी शेतकरी आहे. ९३ हजार ८९८ शेतकरी हे किसान क्रेडिट कार्डपासून आजही वंचित आहे. या शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करुन देण्यासाठी २४ एप्रिल रोजी जिल्हयातील सर्व ग्रामपंचायतीत विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात येणार आहे. ज्या बँकांच्या कार्यक्षेत्रात जी गावे येतात,त्या बँकांचे अधिकारी व कर्मचारी या ग्रामसभांना संबधित गावात उपस्थित राहून ज्या शेतकऱ्यांनी अद्यापही किसान क्रेडिट कार्ड काढले नाही त्यासाठी त्यांचे कृषी कर्ज अर्ज या ग्रामसभेत भरुन घेणार आहे. ज्या शेतकऱ्यांना यापूर्वी किसान क्रेडिट कार्ड मिळाले आहे, त्यांचे नुतनीकरण तसेच होणार आहे. त्यामुळे त्यांनी उपस्थित राहण्याची आवश्यकता नाही.

               ” किसान भागीदारी प्राथमिकता हमारी ” या मोहिमेदरम्यान ज्यांचेकडे किसान क्रेडिट कार्ड नाही अशांना हे कार्ड उपलब्ध करुन देण्याची कार्यवाही जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार, महसूल, ग्रामविकास, कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध विकास व मत्स्य विभाग, राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक अर्थात नाबार्ड आणि जिल्हा अग्रणी बँक समन्वयाने करणार आहे.

               किसान क्रेडिट कार्ड संबंधितांना उपलब्ध करुन देण्यासाठी पात्र लाभार्थ्यांचे अर्ज २४ एप्रिल रोजी आयोजित विशेष ग्रामसभेत घेवून १ मे २०२२ पर्यंत त्यांना किसान क्रेडिट कार्ड देण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत विमा कंपन्याचे जिल्हा व्यवस्थापक व कृषी विभागाच्या समन्वयाने २४ एप्रिल रोजी आयोजित विशेष ग्रामसभेत विमा योजनेविषयी उपस्थित ग्रामस्थांना माहिती देणार आहे. २६ एप्रिल रोजी गावनिहाय पीक विमा पाठशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.या पाठशाळेत शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेबाबतची माहिती देवून या योजनेत शेतकऱ्यांचा सहभाग वाढविण्यात येणार आहे.तरी ” किसान भागीदारी प्राथमिकता हमारी ” ही मोहिम यशस्वी करावी.असे आवाहन जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी केले आहे.