उपजिल्हा रुग्णालय तिरोडा येथे तालुकास्तरीय २४ एप्रिलला आरोग्य मेळावा

0
27

 गोंदिया,दि.22 : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याचा भाग म्हणून, आयुष्यमान भारत, राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य प्रशासन गोंदिया तर्फे २४ एप्रिल रोजी रविवारला सकाळी ८ ते दुपारी १ वाजतापर्यंत उपजिल्हा रुग्णालय तिरोडा येथे तालुकास्तरीय निःशुल्क आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या मेळाव्याचे उद्घाटन खासदार सुनील मेंढे यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार विजय रहांगडाले हे राहतील.

          या कार्यक्रमाचे विशेष अतिथी खासदार प्रफुल पटेल तर मार्गदर्शक म्हणून आमदार डॉ.परिणय फुके, आमदार अभिजित वंजारी, नागो गाणार उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जिल्हाधिकारी नयना गुंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अमरीश मोहबे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन वानखेडे उपस्थित राहणार आहेत.

         या शिबिरात तज्ञ डॉक्टरांची उपस्थिती राहणार आहे. यामध्ये हृदयरोग तज्ञ, बालरोग तज्ञ, स्त्री रोग तज्ञ, अस्थिरोग तज्ञ, शस्त्रक्रिया तज्ञ, डोळ्याचे तज्ञ, नाक कान घसा तज्ञ, दंतरोग तज्ञ रुग्णांची तपासणी करतील. रुग्णांच्या रक्त चाचण्या मोफत केल्या जातील. गरजू रुग्णांवर शस्त्रक्रिया केल्या जातील. या सर्व सेवा मोफत पुरविल्या जाणार आहेत. त्याचप्रमाणे सर्व रुग्णांना औषधी देखील मोफत दिल्या जाणार आहेत.

          या शिबिरात आयुष्मान भारत कार्ड नोंदणी, आयुष्यमान भारत डिजिटल अभियानांतर्गत हेल्थ आयडी नोंदणी, महात्मा फुले जन आरोग्य योजना बाबतची नोंदणी करण्यात येणार आहे. या करीता सर्व पात्र लाभार्थ्यांना स्वतःचे आधार कार्ड, राशन कार्ड, प्रधानमंत्री लेटर व दोन पासपोर्ट साईज फोटो सोबत आणण्याचे आवाहन करण्यात येत आहे. कुपोषित बालक, दुर्धर आजाराची बालके, नवजात बालके, अति जोखमीच्या माता व गंभीर रोगांनी ग्रस्त सर्व वयोगटातील रुग्णांची तपासणी व उपचार करण्यात येणार आहे. आवश्यक रुग्णांना पुढील उपचारासाठी मार्गदर्शन केले जाणार आहे. हृदयरोग, उच्च रक्तदाब, मधुमेह, दमा, कर्करोग, मोतिया बिंदू सारख्या असंसर्गजन्य आजारांवर तपासणी, औषध उपचार व मार्गदर्शन या शिबिरात उपलब्ध राहील. याशिवाय क्षयरोग, कुष्ठरोग, मलेरिया, हत्तीरोग, सिकलसेल आजार, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, आयुष्मान भारत योजना याबद्दल जनजागृतीचे विविध स्टॉल राहणार आहेत. तसेच ऑनलाईन टॅलीकन्सल्टन्सी ची सुविधा देखील शिबिरात उपलब्ध राहणार आहे. शासनाच्या आरोग्याबाबत विविध योजनांच्या नोंदणीचे ऑनलाईन स्टॉल सुद्धा राहतील.

          शस्त्रक्रिया करिता निवड झालेल्या रुग्णांच्या शस्त्रक्रियेचे नियोजन करून शस्त्रक्रिया देखील करण्यात येतील. तरी तिरोडा तालुक्यातील सर्व नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने मेळाव्यात सहभागी होऊन लाभ घ्यावा, असे आवाहन आरोग्य मेळावा तिरोडा तालुका समितीचे अध्यक्ष तथा खंडविकास अधिकारी  सतीश लिल्हारे, सदस्य सचिव तथा वैद्यकीय अधीक्षक डॉ. हिंमत मेश्राम, सदस्य सचिव तथा तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वाती घोडमारे, सदस्य एम डी पारधी, तालुका शिक्षण अधिकारी सितेस पटले, विस्तार अधिकारी पंचायत व समाज कल्याण विनोद चौधरी, तालुका माता बाल विकास अधिकारी चंद्रकांत गौतम व विस्तार अधिकारी आरोग्य श्रीमती प्रियंका तारू यांनी केले आहे.