यापुढे रेतीतस्करांवर कठोर कारवाई-पोलिस अधीक्षक वसंत जाधव

0
39

भंडारा- भंडाराचे उपविभागीय अधिकारी रवींद्र राठोड यांच्यावर पवनी तालुक्यातील बेटाळा येथे रेतीतस्करांकडून झालेल्या जीवघेण्या हल्ल्याची गंभीर दखल महसूल आणि पोलिस यंत्रणेने घेतली आहे. यापुढे रेतीतस्करांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. रेती चोरीवर धाड मारण्यासाठी जाणार्‍या महसूल विभागाला सशस्त्र पोलिसांचा बंदोबस्त पुरविण्यात येईल, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक वसंत जाधव यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
उपविभागीय अधिकार्‍यांवर हल्ला करणार्‍यांपैकी धर्मेंद्र नखाते, राजेश मेघरे, राहूल काटेखाये, प्रशांत मोहरकर या चार आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, त्यांना २ मेपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. तर बोला बुक्कावन, दिनेश बांगळकर, आकाश पंचभाई, गणेश मुंडले, अक्षय तलमले, सागर बरडे, प्रदीप भोंदे, मंगेश नागरीकर, प्रणय तलमले, चेतन बावनकर, भूषण भूरे, जितू तलमले, प्रतीक नागपूरे, गणेश जुनघरे, नितीन जुनघरे, विक्र म हटवार, अमोल भोंदे हे आरोपी फरार असून, त्यांच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे शाखा, उपविभागीय पोलिस अधिकारी पवनी, पोलिस स्टेशन पवनी यांचे विविध पथक पाठविण्यात आले आहेत. सदर आरोपी हे नागपूर आणि परिसरात असल्याची माहिती असून, लवकरच त्यांना अटक केली जाईल, असे पोलिस अधीक्षक वसंत जाधव यांनी सांगितले.
सन २0२१ मध्ये रेती तस्करीचे एकूण ४९ गुन्हे दाखल झाले असून, ११२ आरोपींना अटक करण्यात आली. तर २0२२ मध्ये रेती तस्करीचे एकूण १४ गुन्हे दाखल असून, ३३ आरोपींना अटक करण्यात आली आहे. दोन्ही वर्षात ७३ गुन्हे दाखल करून १४५ आरोपींना अटक करण्यात आली. आरोपींकडून ९ कोटी ४६ लाख ५0 हजार ४४0 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.