Home विदर्भ शेतकऱ्यांना बियाणे,खते व पिक कर्ज योग्यवेळी उपलब्ध व्हावे-पालकमंत्री शंभुराज देसाई

शेतकऱ्यांना बियाणे,खते व पिक कर्ज योग्यवेळी उपलब्ध व्हावे-पालकमंत्री शंभुराज देसाई

0

खरीप हंगामपूर्व आढावा बैठक

वाशिम, दि. 30 :
जिल्हयात मोठया प्रमाणात सोयाबीनचे उत्पादन शेतकरी घेतात. शेतकऱ्यांना या खरीप हंगामात सोयाबीन बियाणे, रासायनिक खते व पिक कर्ज योग्यवेळी उपलब्ध करुन देवून त्यांची खरीप हंगामात गैरसोय होणार नाही यादृष्टीने कृषी विभाग आणि बँकांनी दक्षता घ्यावी. असे निर्देश पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी दिले.

आज 30 एप्रि‍ल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटाक सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत अध्यक्षस्थानावरुन श्री. देसाई बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, आ.अमित झनक, आ.राजेंद्र पाटणी, जिल्हाधिकारी वसुमना पंत,सहाय्यक जिल्हाधिकारी कुलदिप जंगम,जि.प.उपाध्यक्ष डॉ. श्याम गाभणे,जि.प अर्थ व बांधकाम समिती सभापती सुरेश मापारी,निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार,जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक दत्तात्रय निनावकर, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी विकास बंडगर, महाबीजचे जिल्हा व्यवस्थापक डॉ.प्रशांत घावडे तसेच सर्व तालुका कृषी अधिकारी प्रामुख्याने उपस्थि‍त होते.

श्री. देसाई पुढे म्हणाले, जिल्ह्याचे मुख्य पीक हे सोयाबीन आहे.जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उत्पादीत केलेल्या सोयाबीन बियाण्याची तपासणी करुन त्याच बियाण्याचा वापर शेतकऱ्यांनी पेरणीसाठी करावा यासाठी त्यांना कृषी विभागाने प्रोत्साहित करावे. कृषी विभागाने पुढाकार घेवुन शेतकऱ्यांचे सोयाबि‍न उत्पादन वाढीसाठी त्यांना प्रमाणित केलेल्या बियाण्याचा पुरवठा करावा.शेतकऱ्यांना पेरणीच्या वेळी खते उपलब्ध झाले पाहीजे याचे नियोजन कृषी विभागाने करावे. वाशि‍म हा आकांक्षीत जिल्हा असल्याने जिल्ह्याला आवश्यक‍ तेवढे खत उपलब्ध होण्यासाठी पाठपुरावा करण्यात यावा.असे श्री. देसाई म्हणाले.

खरीप हंगामात शेतकऱ्यांना बँकांनी योग्यवेळी पिककर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हा अग्रणी बँकेने जिल्ह्यातील विविध बँकाच्या शाखांकडे सातत्याने पाठपुरावा करावा असे सांगुन श्री.देसाई म्हणाले, तालुका पातळीवर बॅंकांच्या सभा आयोजित करण्यात याव्यात. तसेच खरीप हंगामात पि‍क कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी बँकांनी पीक कर्ज मेळावे आयोजित करावे. पीक कर्जापासून कोणताही पात्र शेतकरी वंचित राहणार नाही याकडे विशेष लक्ष द्यावे.पिक कर्ज मिळत नसल्याबाबत कोणत्याही शेतकऱ्याची तक्रार येणार नाही याबाबत बँकांनी दक्षता घ्यावी असे त्यांनी सांगि‍तले.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री.तोटावार यांनी यावेळी खरीप हंगाम पूर्वतयारीची माहिती दिली. श्री.तोटावार म्हणाले,शेतकऱ्यांचा खरीप हंगाम 2022 यशस्वी होण्यासाठी सुक्ष्म नियोजन करण्यात आले आहे.यापुर्वी तालुकास्तरावर खरीप हंगामपूर्व आढावा बैठका घेण्यात आल्या. जिल्ह्यात खरीप हंगामात 75 टक्के क्षेत्र सोयाबीन पिकाखाली असून यावर्षी 3 लक्ष 7 हजार हेक्टरवर सोयाबीन लागवडीचे नियोजन केले आहे.जिल्ह्यात गावपातळीवर योग्य नियोजन करुन 2 लाख 85 हजार 386 क्विंटल घरगुती बि‍याणे व उन्हाळी हंगामातील 23 हजार 900 क्विंटल असे एकुण 3 लक्ष 9 हजार 286 क्विंटल सोयाबिन बियाण्याची उपलब्धता झाल्याचे त्यांनी सांगि‍तले.

या खरीप हंगामात ट्रॅक्टरव्दारे पेरणी करतांना शेतकऱ्यांकडून व ट्रॅक्टर चालकांकडुन चुका होणार नाही याची दक्षता घेण्यात आल्याचे सांगुन श्री. तोटावार म्हणाले, मागील हंगामात शेतीच्या बांधावर 15 हजार 720 क्विंटल बियाणे आणि 7125 मे. टन खत पुरवठा केला. जिल्ह्यात सोयाबीनची उत्पादकता वाढविण्यासाठी अष्टसुत्री कार्यक्रम हाती घेतला आहे. यंदाच्या खरीप हंगामात रासायनिक खताची मागणी 73 हजार मे.टन आहे. जिल्ह्यात आज 24 हजार 145 मे.टन खत उपलब्ध झाले असल्याचे श्री.तोटावार यांनी सांगीतले.

जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक श्री.निनावकर यांनी पिक कर्जाबाबत माहिती दिली. सन 2021 च्या खरीप हंगामात 1 लाख 4 हजार 711 शेतकऱ्यांना 1025 कोटीचे पीक कर्ज वाटपाचे उद्दीष्ट दिले असता प्रत्यक्षात 1 लाख 5 हजार 785 शेतकऱ्यांना 902 कोटी 25 लक्ष रुपये पीक कर्ज वाटप केले. चालु खरीप हंगामात 1 लाख 5 हजार शेतकऱ्यांना 1050 कोटी रुपये पीक कर्ज वाटपाचे उद्दीष्ट असून 29 एप्रि‍लपर्यंत 44 हजार 799 शेतकऱ्यांना 375 कोटी रुपये पीक कर्ज वाटप केल्याचे श्री.निनावकर यांनी सांगितले. यावेळी विविध विभागाचे अधिकारी सुध्दा उपस्थित होते.

error: Content is protected !!
Exit mobile version