Home विदर्भ योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीतून मागास जिल्हयाचा ठपका मिटविणार- पालकमंत्री शंभूराज देसाई

योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीतून मागास जिल्हयाचा ठपका मिटविणार- पालकमंत्री शंभूराज देसाई

0

महाराष्ट्राचा 62 वा वर्धापन दिन साजरा

 वाशिमदि. 01  20 वर्षापूर्वी निर्माण झालेला वाशिम हा छोटा जिल्हा आहे. जिल्हयाचे मागासलेपण ओळखून केंद्र सरकारने वाशिमचा समावेश आकांक्षित जिल्हयात केला आहे. जिल्हयात विविध पायाभूत सुविधा निर्माण करण्यासोबतच योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीतून मागास जिल्हा म्हणून लागलेला ठपका मिटविणार असल्याची ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.

              आज 1 मे रोजी महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 62 व्या वर्धापन दिनानिमित्त पोलीस कवायत मैदान येथे राष्ट्रध्वजारोहण श्री. देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थितांना संबोधन करतांना ते बोलत होते.

              या कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, आमदार ॲड. किरणराव सरनाईक, पद्मश्री पुरस्कार प्राप्त साहित्यीक नामदेव कांबळे, जिल्हा परिषद अर्थ व बांधकाम समिती सभापती सुरेश मापारी, जिल्हाधिकारी वसुमना पंत, पोलीस अधिक्षक बच्चन सिंह, सहायक जिल्हाधिकारी कुलदीप जंगम, अप्पर पोलीस अधिक्षक गोरख भामरे, सहायक पोलीस अधिक्षक महक स्वामी, अपर जिल्हाधिकारी शहाजी पवार, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिता आंबरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता व्हि.एम. मिठ्ठेवाड, जिल्हा अग्रणी व्यवस्थापक दत्तात्रय निनावकर, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार प्रामुख्याने उपस्थित होते.

              श्री. देसाई पुढे म्हणाले, जिल्हयाच्या विकासात स्व. बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्गाची भूमिका महत्वाची राहणार आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा महामार्ग उपयुक्त ठरणार आहे. जिल्हयात जलसिंचनाचे मोठे प्रकल्प नाही. त्यामुळे जिल्हयातील नादुरुस्त असलेले लघुसिंचन प्रकल्प दुरुस्त करण्याचा निर्णय पालकमंत्री म्हणून आपण घेतला आहे त्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून निधी उपलब्ध करुन दिला. मागील दोन वर्षात नादुरुस्त असलेल्या 54 लघुसिंचन प्रकल्पाच्या दुरुस्तीची कामे हाती घेतली. या प्रकल्पाला पुनर्जीवित करुन या प्रकल्पात पाणीसाठा निर्माण करुन जवळपास 6 हजार एकर शेतीला आठमाही सिंचन व्यवस्था यामधून निर्माण होण्यास मदत होणार आहे. येत्या पावसाळयात व पुढील पावसाळयात या प्रकल्पात पाणी साठवून सिंचनाची व्यवस्था निर्माण झालेली असेल. आपल्या आकांक्षित जिल्हयात हा प्रकल्प राबविल्याने त्याचे यश पाहून राज्यातील उर्वरित 3 आकांक्षित जिल्हयात जलसिंचनाचा वाशिम पॅटर्न राबविण्याचा निर्णय मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्य सरकारचे धोरण म्हणून हा पॅटर्न राबविण्याचा निर्णय घेतल्याचे श्री. देसाई यांनी सांगितले.

              जिल्हयात ग्रामीण रस्त्यांसाठी मागील पाच वर्षात जेवढा निधी उपलब्ध झाला नव्हता तेवढा निधी सन 2021-22 या वर्षात जिल्हा परिषदेच्या ग्रामीण रस्त्यांसाठी दिला असल्याचे सांगून श्री. देसाई म्हणाले, जिल्हयातील 550 गावांचा पाणीपुरवठा योजनांचा आराखडा जलजीवन मिशनच्या माध्यमातून तयार करण्यात आला आहे. जास्त निधी जिल्हयातील पाणी पुरवठा योजनांसाठी मिळावा याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविला आहे. त्या सर्व प्रस्तावांना मान्यता मिळण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. आरोग्य सेवांचे बळकटीकरण करुन दर्जेदार स्वरुपाच्या सेवा मिळाव्यात यासाठी जिल्हा नियोजन समितीतून 25 कोटी रुपये निधी उपलब्ध करुन देण्यात आल्याचे ते म्हणाले.

             श्री. देसाई पुढे म्हणाले, जिल्हयाच्या विकासाच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या जिल्हा नियोजन समितीचा आराखडा जवळपास 150 कोटी रुपयांच्या आसपास होता. आपण पालकमंत्री म्हणून जबाबदारी स्विकारल्यापासून जिल्हा नियोजन आराखडयात मोठी वाढ केली आहे. मागील वर्षी हा आराखडा 185 कोटीचा होता. तर यावर्षीचा आराखडा 205 कोटी रुपयांचा आहे. जिल्हयाची ओळख विकसनशील जिल्हा आणि पायाभूत सुविधा निर्माण करुन सर्व सामान्य माणसांपर्यंत विविध योजना पोहचलेला जिल्हा म्हणून वाशिम पुढे येईल असा विश्वास पालकमंत्र्यांनी यावेळी व्यक्त  केला.

            प्रारंभी पालकमंत्री देसाई यांनी राष्ट्रध्वजारोहण करुन परेडचे निरीक्षण केले. परेडमध्ये पुरुष व महिला पोलीस दल, पुरुष व महिला गृहरक्षक दल, पोलीस बॅन्ड पथक, पोलीस श्वान पथक, मोबाईल फॉरेन्सीक इन्व्हेस्टिगेशन व्हॅन, रुग्णवाहिका व अग्नीशमन दल सहभागी होते.

             यावेळी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून वाशिम जिल्हयातील महिलांच्या सुरक्षेकरीता पोलीस विभागाला जिल्हास्तरावर आणि पोलीस स्टेशनवरील निर्भया पथकासाठी देण्यात आलेल्या 15 टिव्हीएस ज्युपीटर टू-व्हिलर व 7 चारचाकी वाहनाला पालकमंत्र्यांनी हिरवी झेंडी दाखविली.

             देशसेवेत वीरमरण आलेल्या सैनिकांच्या पत्नींचा यावेळी साडीचोळी, शाल व श्रीफळ देवून पालकमंत्र्यांनी सन्मान केला. समाज कल्याण कार्यालयाच्या वतीने विविध योजनांची माहिती देण्यासाठी लावण्यात आलेल्या स्टॉलला पालकमंत्री श्री. देसाई यांनी भेट दिली. कार्यक्रमाला उपस्थित नागरीकांची पालकमंत्र्यांनी भेट घेतली. यावेळी विविध विभागाचे प्रमुख अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व उपस्थितांचे आभार शिक्षक मोहन सिरसाट यांनी मानले.

Exit mobile version