विदर्भातील मालगुजारी तलावांच्या दुरुस्तीसाठी विशेष योजना – जलसंधारण सचिव दिलीप पांढरपट्टे

0
48

जलसंधारणासाठी प्रथमच चार हजार कोटींची तरतूद

नागपूर, दि. 2 : जलसंधारणाच्या योजनांच्या प्रभावी व परिणामकारक अंमलबजावणीला शासनाने प्राधान्य दिले असून त्यासाठी चार हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. विदर्भातील मालगुजारी तलावांच्या दुरुस्तीसोबतच गडचिरोली येथे स्वतंत्र जिल्हा जलसंधारण कार्यालय तसेच वडसा येथे उपविभागीय कार्यालय सुरु करण्यात आल्यामुळे योजनांची अंमलबजावणी तसेच शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यास मदत होणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे जलसंधारण सचिव दिलीप पांढरपट्टे यांनी केले.

महाविकास आघाडी सरकारच्या दोन वर्षांच्या कारकीर्दीचा आढावा घेणारे चित्रप्रदर्शन सीताबर्डी येथील मेट्रो स्टेशन येथे आयोजित करण्यात आले आहे. जलसंधारण सचिव श्री. पांढरपट्टे यांनी या राज्यस्तरीय प्रदर्शनाची  पाहणी केली. कोरोना काळात विकासाच्या कामे होऊ शकली नाहीत. परंतु त्यानंतर योजनांना गती मिळाल्यामुळे जनतेला योजनांचा लाभ मिळत आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून जनतेपर्यंत विकास योजना पोहचण्यास मदत होणार असल्याचा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.

जलसंधारणाच्या योजनांना प्राधान्य देण्यात आले असून  यावर्षी चार हजार कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली असल्याची माहिती देताना श्री. पांढरपट्टे म्हणाले की, नवीन कामे सुरु करण्यासाठी जलसंधारण महामंडळाला अधिकार देण्यात आले आहेत. त्यासोबतच जुने व अपूर्ण कामे पूर्ण करुन सिंचनासह भूगर्भातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होणार आहे. मुख्यमंत्री  जलसंधारण योजनेच्या माध्यमातून योजनांच्या दुरुस्तीचे कामे घेण्यात येत आहेत.

विदर्भातील जलसंधारणांची कामे प्राधान्याने पूर्ण व्हावित तसेच भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व नागपूर जिल्ह्यातील सिंचनासाठी उपयुक्त ठरत असलेल्या माजी मालगुजारी तलावांच्या दुरुस्तीसाठी महत्त्वाकांक्षी योजना राबविण्यात येत असल्याचे सांगताना श्री. पांढरपट्टे म्हणाले की, गडचिरोली येथे स्वतंत्र कार्यालय नसल्यामुळे चंद्रपूर येथून जिल्ह्याच्या योजनांची अंमलबजावणी करण्यास अडचणी निर्माण होत होत्या. तसेच नागरिकांनाही याचा त्रास होत असल्यामुळे महाराष्ट्र दिनापासून स्वतंत्र कार्यालय सुरु करण्यात आले आहे. तसेच वडसा येथे नवीन उपविभागीय कार्यालय सुरु करण्यात आली असल्याची माहिती यावेळी जलसंधारण सचिवांनी दिली.

प्रारंभी माहिती संचालक हेमराज बागुल यांनी पुष्पगुच्छ देऊन श्री. पांढरपट्टे यांचे स्वागत केले. तसेच प्रदर्शनाच्या आयोजनासंदर्भात माहिती दिली. या प्रदर्शनामध्ये नागपूर विभागातील जिल्हानिहाय विकास कामांची माहिती असलेले पॅनल स्वतंत्रपणे ठेवण्यात आले आहे. याबद्दल जलसंधारण सचिवांनी विशेष कौतुक केले.