राज्यात लाखोंपर्यंत पोहचला सामाजिक न्यायाच्या योजनांचा जागर

0
27

गोंदिया,दि.०२ :- राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून साकारलेला सामाजिक न्याय विभागाच्या योजनांचा जागर कार्यक्रम राज्यातील लाखो जनतेपर्यंत पोहोचला आहे. अमृत महोत्सव वर्षे तसेच १ मे महाराष्ट्र दिनाच्या औचित्य साधून राज्यातील प्रत्येक गावात योजनांची माहिती पोहोचविण्याचे उद्दिष्ट जागर कार्यक्रमांच्या माध्यमातून समाज कल्याण विभागाने ठरविण्यात आले होते. योजनांची माहिती व प्रसारासाठी विभागाने युद्धपातळीवर यंत्रणा कार्यान्वित केली होती. प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक गावात विभागाच्या योजनांची माहिती पुस्तके, माहिती पत्रिका पोहोच करण्यात आली होती.

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात त्या  त्या जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या हस्ते या स्टॉलचे उद्घाटन करण्यात आले.  यावेळी उपस्थित असलेल्या सर्वांना समाज कल्याण विभागा कडून विविध योजनांची माहिती दिली जात होती.  महाराष्ट्र दिनी राज्यात एकाच दिवशी बहुतांश ठिकाणी एकाच वेळी झालेल्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने लाखो लोकांपर्यंत योजनांची माहिती उपलब्ध झाली आहे.

झेंडा वंदनाच्या कार्यक्रम स्थळी  सामाजिक न्याय विभागाच्या सर्व योजनांची माहिती देणारी माहिती पत्रिका तसेच माहिती पुस्तिका वाटप करण्यात आली. विभागाच्या योजनांच्या बाबतीत जनजागृती करून तळागाळातील गरजूंना लाभ मिळवून देणे हा यामागचा उद्देश आहे. दरम्यान आजच्या महाराष्ट्र दिनाच्या दिवशी झालेल्या या कार्यक्रमाचे समाजातील सर्व स्तरातून कौतुक झाले आहे,

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील समाज कल्याण विभागाचे उपक्रमाबद्दल अभिनंदन केले आहे.

पोलीस मुख्यालय, गोंदिया येथे आयोजित झेंडा वंदनाच्या प्रसंगी गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री प्राजक्त तनपुरे यांचे शुभ हस्ते श्रीमती नयना गुंडे जिल्हाधिकारी गोंदिया, अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गोंदिया, विश्व पानसरे, पोलीस अधिक्षक, गोंदिया, जिल्यातील विविध विभागाचे अधिकारी/ पदाधिकारी व इतर मान्यवर यांच्या प्रमुख उपस्थितीत  सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय गोंदिया द्वारे विभागाच्या योजनांचा प्रचार-प्रसार करण्याकरीता तयार करण्यात आलेल्या स्टॉल चे उद्घाटन करण्यात आले.

सदर स्टॉलमध्ये सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना, विभागांतर्गत विविध महामंडळा मार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची उपस्थित असलेल्या सर्वांना माहिती करून देण्यात आली. समाज कल्याण विभागाचे सचिव सुमंत भांगे व समाज कल्याण विभागाचे आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे यांनीही कार्यक्रमात सहभाग घेतला व संपूर्ण राज्यात कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.

राज्यात प्रथमच अभिनव पद्धतीने शासनाच्या वतीने असा उपक्रम राबविण्यात आल्याने समाजातील सर्व स्तरातून विभागाचे अभिनंदन करण्यात येत आहे.

समाज कल्याण विभागाचे सर्व उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद यांच्यासह सह विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांच्या बरोबरच बार्टीचे अधिकारी-कर्मचारी, तालुका समन्वयक, समता दूत, स्वयंसहायता युवा गटाचे प्रतिनिधी हे गावागावात पोहोचले होते त्यांनी योजनांची माहिती जनतेला करून दिली.

अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला  कार्यक्रमात सहभागी झालेले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, यांच्यासह राज्यातील त्या-त्या जिल्ह्यांचे पालकमंत्री सर्व शासकीय यंत्रणांचे अधिकारी /कर्मचारी यांचे समाज कल्याण मंत्री  धनंजय मुंडे यांनी आभार व्यक्त केले आहे.