ग्रामीण विकास व जलसंधारण विभागांतर्गत करण्यात आलेल्या कामांची उच्चस्तरीय चौकशी करा

0
32

चंद्रपूर दि ०7 मे-चंद्रपूर जिल्ह्यात ग्रामीण विकास व जलसंधारण विभागाच्या वतीने मोठ्या प्रमाणावर कोल्हापुरी बंधारे व तलावाचे बांधकाम करून सर्वेक्षण करण्यात आले. मात्र, या विभागाच्या वतीने ब्रह्मपुरी तालुक्यात करण्यात आलेल्या कोल्हापुरी बंधारे व तलावाच्या बांधकामासह सर्वेक्षणाच्या कामात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला असून या विभागामार्फत करण्यात आलेल्या कामांची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी अशी मागणी एड. गोविंद भेंडारकर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेतून केली आहे. यावेळी उमाकांत धांडे उपस्थित होते.

ब्रह्मपुरी तालुक्यात कोल्हापुरी बंधारे व तलावाचे बांधकाम करण्यात आले. मात्र, ग्रामीण विकास व जलसंधारण विभागाच्या वतीने सदर बांधकामाचे सर्वेक्षण करताना स्थानिक कर्मचारी व ठेकेदाराकडुन भ्रष्टाचार झाला. संबंधित कार्यकारी अभियंता, अधिक्षक अभियंता व विभागीय लेखा अधिकारी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली असून ३ मे रोजी ५० लाख रुपयाची रक्कम संबंधित अधिकाऱ्याकडुन जप्त करण्यात आली आहे. यावरून मृद व जलसंधारण विभागात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याचे समजते. तसेच गोसीखुर्द प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रात बेकायदेशिरपणे बंधारे बांधण्यात आले असून या करीता आवश्यक परवानगी व पाणी वाटप सहकारी संस्था हे केवळ कागदावरच करण्यात आले आहे. यामुळे दाखविण्यात आलेली सिंचनाची आकडेवारी ही खोटी व दिशाभूल करणारी दाखवण्यात आलेली आहे. त्यामुळे संबंधीत विभागाने केलेल्या सर्वेक्षण व कामाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी पत्रकार परिषदेतून केली आहे.