चिखलदरा व धारणी येथे साकारणार नवीन प्रशासकीय इमारत; पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

0
17

अमरावती, दि. 08 :- जिल्ह्यात रस्ते, पूल, इमारती आदी पायाभूत सुविधांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. चिखलदरा व धारणी येथे एकूण ३० कोटी रुपये निधीतून नवीन प्रशासकीय इमारत निर्माण होणार असून हे काम उत्कृष्ट, गुणवत्तापूर्ण व लवकरात लवकर पूर्ण करावे, असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी  दिले.

चिखलदरा व धारणी येथे प्रत्येकी सुमारे 15 कोटी निधीतून नवीन प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन करताना त्या बोलत होत्या. मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल, आमदार बळवंतराव वानखडे, माजी आमदार वीरेंद्र जगताप, माजी जि. प. अध्यक्ष बबलुभाऊ देशमुख, माजी सभापती बाळासाहेब हिंगणीकर, जिल्हाधिकारी पवनीत कौर, उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार, हरिभाऊ मोहोड , सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता कुणाल पिंजरकर आदी उपस्थित होते.


पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, मेळघाटसह जिल्ह्यात सर्वदूर पायाभूत सुविधांच्या कामांना चालना देण्यात आली आहे.  नवीन प्रशासकीय इमारतीमुळे धारणी व चिखलदरा येथे एक चांगली सुविधा निर्माण होणार आहे. हे काम विहित मुदतीत पूर्ण करावे. काम गुणवत्तापूर्ण असावे. कामाशी तडजोड होता कामा नये. कामात विलंब खपवून घेणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

चिखलदरा व धारणी या तालुक्यांच्या ठिकाणी आदिवासी बांधव प्रशासकीय कामांसाठी दुरदूरून येत असतात. त्यांच्या निवाऱ्याची सुविधा उभारण्यात यावी. त्याचप्रमाणे, आवश्यक कामांचे प्रस्ताव द्यावेत. विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी  ग्वाही त्यांनी दिली.
मेळघाटात पेयजल व इतर आवश्यक सुविधांच्या अनुषंगाने तत्काळ कार्यवाही व्हावी. त्यादृष्टीने प्रशासनाने कामांना गती द्यावी.  मेळघाटातील समस्यांचे निराकरण व विकासकामांच्या पाठपुराव्यासाठी पालकमंत्री कार्यालयातही स्वतंत्र डेस्कची निर्मिती करण्यात येईल. त्याचप्रमाणे, धारणी पंचायत समितीच्या इमारतीचे कामही लवकरच हाती घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
मेळघाटात दोन्ही तालुक्यांच्या ठिकाणी उत्तम इमारती उभ्या राहणार आहेत. चिखलदरा व धारणी येथील दोन्ही  इमारती प्रशस्त व सर्व सुविधायुक्त असतील. हे काम एका वर्षात पूर्ण व्हावे, असे आमदार श्री. पटेल यांनी सांगितले.
कार्यक्रमाला अधिकारी, कर्मचारी यांच्यासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.