नागपूर, 22 जून २०२२ : भारतातील आघाडीच्या तीन उदबत्ती ब्रँडपैकी एक असलेल्या मध्यप्रदेशमधील म्हैसूर दीप परफ्युमरी हाउस (एमडीपीएच) या कंपनीने आपल्या झेड ब्लॅक या लोकप्रिय ब्रँडसह आज नागपूरमध्ये पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत त्यांनी, नागपूर येथील श्रीफल इंडस्ट्रीज आणि श्रीफल गृह उद्योग यांच्याविरुद्ध जिंकलेल्या कायदेशीर लढाईची माहिती दिली.
या महिन्याच्या सुरुवातीला, एमडीपीएचने बनावटीकरणाविरुद्धचा आणि एमडीपीएचच्या ‘श्रीफळ’ सारख्या नावाचा/चिन्हाचा वापर श्रीफल इंडस्ट्रीजने केल्याबद्दल दाखल केलेला खटला जिंकला.
एमडीपीएच या देशातील एका सर्वात मोठ्या उत्पादकाने व निर्यातदाराने आपल्या बौद्धिक संपदा अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी अनेक आक्षेप / याचिका / तक्रारी दाखल केल्या होत्या. ट्रेड मार्क्स रजिस्ट्रीसमोर, १५०० विरोध नोटिसा दाखल केल्या गेल्या आहेत आणि ट्रेड मार्क्स रजिस्ट्रीसमोर चुकीच्या नोंदणीकृत ट्रेडमार्क्सच्या विरोधात १०० हून अधिक सुधारणा अर्जदेखील दाखल केले आहेत. कंपनीने मनाईहुकूम व नुकसानासाठीचे अनेक दिवाणी खटले दाखल केले आहेत आणि मध्यप्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली, पश्चिम बंगाल, राजस्थान आणि उत्तरप्रदेशसारख्या राज्यांमध्ये बनावटीकरण रोखण्यासाठी अनेक गुन्हेगारी तक्रारी दाखल केल्या आहेत.
वरिष्ठ वकील राजेंद्र भन्साळी यांनी या पत्रकार परिषदेमध्ये अनेक पुरावे सादर केले. ते म्हणाले, “माननीय उच्च न्यायालयाने श्रीफल इंडस्ट्रीज आणि श्रीफल गृह उद्योग यांच्याविरुद्ध दिलेला निकाल हा बनावटीकरणाला आळा घालण्याच्या दिशेने टाकलेले एक उचित पाऊल आहे. पण, मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचे आणि मनाईहुकुमाच्या आदेशाचे श्रीफल इंडस्ट्रीज आणि श्रीफल गृह उद्योग यांनी पालन केलेले नाही. आपल्या ट्रेडमार्क अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी आणि ग्राहकांना बनावट उत्पादने खरेदी करायला लावून त्यांची फसवणूक होणार नाही, याची खातरजमा करण्यासाठी कंपनीने आक्रमक पवित्रा घेतला आहे.”
म्हैसूर दीप परफ्युमरी हाउसचे व्यवस्थापकीय संचालक अंकित अगरवाल पुढे म्हणाले, “बनावट उत्पादनांच्या बाजारपेठेवर कायम लक्ष ठेवून असणे आणि विक्रेत्यांच्या अनेक चमूंनी व एमडीपीएचच्या हितचिंतकांनी दिलेली माहिती यामुळे या ब्रँडला बनावटीकरणाविरुद्ध लढा देण्यास मदत झाली आहे. हा लढा यापुढेही सुरू ठेवण्यास आणि दुकानांमधून बनावट उत्पादनांचे उच्चाटन करण्यासाठी आम्ही प्रतिबद्ध आहोत.”