अवैध उत्खनन सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार ….
देवरी:-शेततळ्याच्या नावाखाली देवरी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर मुरुम आणि दगडाचे अवैध उत्खनन सुरु आहे. देवरी शहराच्या दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या शिरपुर/बांध परिसरात असाच अवैध उत्खनन सुरु असल्याचा प्रकार समोर आला आहे.मागील अनेक महिन्यांपासून येथे अवैध दगडाचे उत्खनन सुरु आहे. यामध्ये येथील खडीक्रशर आणि शेत मालकांनी दिवसाढवळ्या महसूल विभागाच्या डोळ्यात धुळफेक करत कोट्यावधी रुपयांची टोपी घातली आहे.
सरकारने शेततळे तयार करण्यासाठी माती आणि दगडाचे उत्खनन करण्यास काही अटी आणि शर्तीवर शेतकऱ्यांना परवानगी दिली आहे. शासनाच्या या सवलतींचा अनेक शेतकरी आणि खडीक्रशर चालकांनी गैरफायदा घेतला आहे. असाच एक प्रकार शिरपुर/बांध येथे समोर आला आहे. येथील शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून अवैध उत्खनन सुरु आहे. येथील जमिनीतून उत्खनन करुन करोडो रुपयाचा महसुल काढण्यात आला आहे. दगड खडी क्रशरसाठी वापरला जात आहे. उत्खनन करण्यासाठी भुसुरुंगाचाही वापर केला जात आहे. बेकायदेशीर उत्खननामुळे या परिसरात पर्यावरणाचा प्रश्न ही या निमित्ताने ऐरणीवर आला आहे. विनापरवाना सुरु असलेल्या येथील अवैध उत्खननामुळे अनेक खडीक्रशर मालक मालामाल झाले आहे. शिरपुर/बांध येथे सुरू असलेले खडीक्रशर हे मुरदोली येथील अग्रवाल कंन्ट्रक्सन कंपनीचे असल्याचेही बोलले जात आहे.
हा सगळा प्रकार गेल्या अनेक महिन्यांपासून बिनबोबाट सुरु असतानाही महसूल प्रशासन मात्र डोळे मिटून गप्प का..? शिरपुर/बांध येथिल स्थानीक तलाठी निन्द्रां अवस्थेत आहेत का..?असा सवालही या भागातील नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. तालुक्यात सुरु असलेल्या अवैध उत्खननाला कोणाचे अभय आहे, याचा शोध घेवून संबंधीत शेतकरी आणि खडी क्रशर मालकांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरु लागली आहे.