रेस्क्यू ऑपरेशनच्या मदत व सहकार्यासाठी औरंगाबाद आर्मी कॅम्पचे मेजर पाटील व महेंद्रसिंग यांची जिल्ह्याला भेट 

0
17
वाशिम दि.०३-मान्सूनपूर्व तयारी म्हणून जिल्ह्यातील नद्यांना महापूर आला तर गावातील लोकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करून आणि पुरात अडकलेल्या लोकांचा जीव वाचविण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशनकरीता मदत व सहकार्यासाठी औरंगाबाद येथील आर्मी कॅम्प सज्ज असल्याची माहिती मेजर डी.एस. पाटील आणि सुभेदार महेंद्र सिंग यांनी नुकतीच वाशिम येथे जिल्हाधिकारी षण्मुगराजन तसेच निवासी उपजिल्हाधिकारी श्री हिंगे यांची भेट घेऊन दिली. यावेळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहु भगत व जलसंपदा विभागाचे उपअभियंता श्री.पिदडी उपस्थित होते.
             वाशिम दौऱ्यावर आलेले आर्मीचे मेजर. पाटील आणि  महेंद्र सिंग यांनी एकबुर्जी प्रकल्पाला भेट दिली.जिल्ह्यातील नदयांच्या पाण्याची पातळी,जिल्ह्यातील प्रकल्पातील पाण्याची पातळी त्याचप्रमाणे जिल्ह्यातील कोणकोणत्या गावांचा नदयांच्या पुरामुळे संपर्क तुटू शकतो याची माहिती देखील त्यांनी घेतली.
             जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील पेनबोरी, चिचंबापेन, बाळखेड आणि वाशिम तालुक्यातील उकळीपेन या गावांना पैनगंगा नदीच्या पुराचा धोका निर्माण होऊ शकतो. तसेच जिल्ह्यात कुठेही पूरपरिस्थिती निर्माण झाली तर अशा वेळी औरंगाबाद येथील आर्मीचे शोध व बचाव पथकाला पाचारण करण्यात येते.जिल्ह्यात सन २००६ मध्ये मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती निर्माण झाली होती.त्यानंतर गंभीर पूरपरिस्थिती निर्माण झालेली नाही.पेनबोरी, चिचांबापेन व बाळखेडा येथून वाहणाऱ्या नदीवर पूल बांधलेले आहे. मोठ्या प्रमाणात पाऊस पडला तर पुलावरून सुद्धा पाणी वाहते.अशी माहिती श्री.भगत यांनी आर्मीचे मेजर श्री.पाटील यांना यावेळी दिली.