Home विदर्भ ज्येष्ठांनी दिलेल्या ज्ञानातून संस्कारक्षम पिढी घडत असते

ज्येष्ठांनी दिलेल्या ज्ञानातून संस्कारक्षम पिढी घडत असते

0

ज्येष्ठ नागरिक दिनी विविध वक्त्यांचे मार्गदर्शन

गोंदिया, दि. 2 : समाजाचे नागरिकीकरण व औद्योगिकीकरण झाल्याने संयुक्त कुटुंब या संकल्पनेचा ऱ्हास झालेला आहे. भारतीय संस्कृती टिकवण्यासाठी आई-वडील, आजी-आजोबासारखे वयोवृध्द व्यक्ति हे एक चांगले माध्यम असून तरुण पिढीला नैतिक मूल्यांचे शिक्षण हे त्यांच्याकडून मिळत असते. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या वयोवृध्द आई-वडीलांचा तसेच इतर ज्येष्ठांचा आदर सन्मान करावा. ज्येष्ठांनी दिलेल्या ज्ञानातून संस्कारक्षम पिढी घडत असल्याने त्यांना चांगली वागणूक द्यावी, असे आवाहन जागतिक ज्येष्ठ नागरीक दिनानिमीत्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात विविध वक्त्यांनी केले.

       जागतिक ज्येष्ठ नागरीक दिनानिमीत्त गोंदिया जिल्हयातील जेष्ठ नागरीकांसाठी नि:शुल्क आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन समाज कल्याण विभागाच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी वक्त्यांनी आपले विचार व्यक्त केले.

       “सेवा पंधरवाडा” (कर्तव्यपथ) या अभियाना अंतर्गत सामाजिक न्याय विभागामार्फत विविध उपक्रम राबविण्यात आले. त्याअनुषंगाने 1 ऑक्टोंबर रोजी “जागतिक जेष्ठ नागरीक दिन” निमित्त सहायक युक्त, समाज कल्याण, गोंदिया यांचे मार्फत सामाजिक न्याय भवन, गोंदिया येथे निःशुल्क आरोग्य तपासणी शिबीर, जेष्ठ नागरीकांकरीता असणारे कायदे व त्यांचे अधिकार, वृध्दपकाळात होणारे आजार, उपाययोजना व उपचारासाठी असलेल्या शासकीय योजना या विषयांवर तज्ञ व्यक्तीचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आलेले होते.

            सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी अध्यक्ष जेष्ठ नागरीक सेवा संघ नारायण प्रसाद जमाईवार  हे होते. प्रमुख अतिथी दुलीचंद बुध्दे, समन्वयक, जेष्ठ नागरीक सेवा संघ, जेष्ठ नागरीकाचे कायदे व त्यांचे अधिकार याविषयावर एस. व्ही. पिंपळे सचिव जिल्हा विधी सेवा प्रधीकरण यांनी मार्गदर्शन केले. वृध्दपकाळात होणारे आजार, उपाययोजना व उपचारासाठी असलेल्या शासकीय योजना या विषयावर डॉ. अमित जोगदंड सहायोगी प्राध्यापक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांनी मार्गदर्शन केले. तर वृध्दानकरीता युवकांचे कर्तव्य व जबाबदारी या विषयावर डॉ. माधुरी नासरे प्राध्यापिका गर्ल्स कॉलेज यांनी आपले विचार व्यक्त केले.

ज्येष्ठ नागरिकांच्या शारीरिक, सामाजिक व कौटुंबिक समस्या सोडविण्यासाठी तसेच त्यांना आवश्यक सहाय्यता करण्यासाठी जेष्ठ नागरिक धोरण राज्य शासानाने अंमलात आणले आहे. वयोवृद्धांचे समस्यांची सोडवणूक करुन त्यांचे जीवन सुसह्य करण्यासाठी सामाजिक न्याय विभागाव्दारे विविध योजना राबविण्यात येतात. ज्येष्ठांकडून मिळणारा ज्ञानाचा वारसा जपून ठेवण्यासाठी तसेच त्यांचाप्रती सन्मान व आदराची जाणीवजागृती करण्यासाठी ज्येष्ठ नागरिक दिन जगात सर्वत्र साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने विविध विभागाने ज्येष्ठ नागरिकांना शासनाच्या योजनांचा लाभ द्यावा असे आवाहन सहायक आयुक्त, समाज कल्याण विनोद मोहतुरे यांनी केले.

            कार्यक्रमामध्ये राजीव गांधी समाजकार्य महाविद्यालय, गोंदिया या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी “आधार कोना मागू मी” व “विसरली रक्ताची नाती” या विषयावर पथनाटय सादर केले. कार्यक्रमाचे संचालन यआशिष जांभुळकर यांनी केले तर व आभार प्रदर्शन श्रीमती कापसे यांनी केले. आरोग्य तपासणी शिबिराचा ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला.

error: Content is protected !!
Exit mobile version