Home विदर्भ ग्राम रोजगार सेवक संघटनेचा एक दिवसीय लाक्षणिक उपोषण

ग्राम रोजगार सेवक संघटनेचा एक दिवसीय लाक्षणिक उपोषण

0

अर्जुनी मोर,दि.04ः-महाराष्ट्र राज्य ग्राम रोजगार सेवक संघर्ष समिती तालुका अर्जुनी मोरच्या वतीने 3 ऑक्टोबर रोजी अर्जुनी मोर पंचायत समिती आवारात ग्राम रोजगार सेवकांच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत रोजगार हमीच्या 264 कामांची अंमलबजावणी करून ग्राम पंचायत क्षेत्रातील मजुरांना विविध कामे उपलब्ध करून देण्यात ग्राम रोजगार सेवकाचा सिंहाचा वाटा असतोय तरीसुद्धा सन 2006 पासून ग्राम रोजगार सेवक उपेक्षीत जिवन जगत आहे. ग्राम रोजगार सेवकांना फक्त सव्वादोन टक्के कमिशन देऊन वेठबिगारीचे काम करण्यास शासन लावत आहे. अनेकांना पोट भरणे सुद्धा कठिण झाले आहे. ग्राम रोजगार सेवकांना शासकीय सेवेत समाविष्ट करावे, 2 मे 2011 चा अर्धवेळ शासन निर्णय रद्द करून पूर्णवेळ करावा. गेल्या पाच वर्षापासून ग्राम रोजगार सेवकांना लागू असलेला प्रवास भत्ता व अल्पोपहार भत्ता देण्यात यावे. ग्राम रोजगार सेवकांचे मानधन त्यांच्या वैयक्तिक खात्यात जमा करावे. मजुरांची ऑनलाईन हजेरी घेण्यासाठी मोबाईल टॅब पुरवून त्याचे प्रशिक्षण देण्यात यावे. रोजगार हमीच्या कामावर काम करणाऱ्या मजुरांना विमा कवच लागू आहे, मात्र संपूर्ण रोजगार हमी योजनेचा डोलारा असणारा ग्राम रोजगार सेवक यांना विमा कवच लागू नाही. याचाच अर्थ रोजगार सेवक हा मजुरांपेक्षाही कमी दर्जाचा असल्याचे शासनाकडून दर्शविण्यात येत आहे. या विविध मागण्यांसाठी शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी अर्जुनी मोर तालुका ग्राम रोजगार सेवक संघटनेच्या वतीने एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. या लाक्षणिक मंडपाच्या उपोषण स्थळी अर्जुनी मोर पंचायत समिती उपसभापती हेमराज पुस्तोडे, पंचायत समिती सदस्य नूतनलाल सोनवणे,दुर्योधन मैद,सरपंच संघटनेचे अध्यक्ष भोजराम लोगडे,  घनश्याम मेहता यांनी भेट दिली. उपोषण यशस्वीतेसाठी महाराष्ट्र राज्य ग्राम रोजगार सेवक संघर्ष समिती संघटक संतोष रोकडे, अर्जुनी मोर ग्राम रोजगार सेवक संघटना उपाध्यक्ष उद्धव झोडे, सचिव नेहमीचंद ब्राह्मणकर व अर्जुनी मोर तालुक्यातील संपूर्ण ग्रामरोजगार सेवकांनी अथक परिश्रम केले.

Exit mobile version