Home विदर्भ जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन 2022 पुस्तिका प्रकाशित

जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन 2022 पुस्तिका प्रकाशित

0

गोंदिया, दि. 13 जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन 2022 ही पुस्तिका जिल्हा सांख्यिकी कार्यालय गोंदिया द्वारे प्रकाशित झाली असून  ती लवकरच अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या संकेतस्थळावर, जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी, गोंदिया यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे अशी माहिती  जिल्हा सांख्यिकी कार्यालयाचे प्रभारी उपसंचालक श्री रुपेशकुमार राऊत यांनी दिली.

गोंदिया जिल्ह्याचे सर्व क्षेत्रातील चालू किंमतीनुसार सन 2020-21 चे स्थूल जिल्हा उत्पन्न 19,510 कोटी रुपये आहे. त्याचप्रमाणे निव्वळ जिल्हा उत्पन्न 17,249 कोटी रुपये असून दरडोई निव्वळ जिल्हा उत्पन्न 1,21,904 रुपये आहे. चालू किंमतीनुसार जिल्ह्याचे स्थूल व निव्वळ उत्पन्न राज्य उत्पनाच्या 0.7 टक्के आहे. चालू किंमतीनुसार जिल्ह्याच्या स्थूल उत्पनाच्या 23.6 टक्के प्राथमिक क्षेत्रातून, 18.8 टक्के द्वितीय क्षेत्रातून व उर्वरित 57.6 टक्के तृतीय क्षेत्रातून प्राप्त झालेले आहे.

सदर पुस्तिकेत एकूण बारा प्रकरणे असून प्रत्येक प्रकरणात जिल्ह्यातील विविध विषयांवरील विस्तृत आकडेवारी उपलब्ध आहे. यामध्ये समालोचन, जिल्ह्यातील निवडक निर्देशक, जिल्हा उत्पन्न अंदाज, जिल्ह्यातील किंमती व सार्वजनिक वितरण व्यवस्था, जमीन व इतर महसूल, स्थानिक स्वराज्य संस्थांचे उत्पन्न/ खर्च, बॅंक व विमा, बचतगट, कृषिविषयक आकडेवारी, जिल्ह्यातील जलसंपदा व लाभक्षेत्र, वने व पर्यावरण, उद्योग व सहकार, पणन, वस्त्रोद्योग बाबत आकडेवारी, पायाभूत सुविधांमध्ये उर्जा,  प्रादेशिक परिवहन व दळणवळण, सार्वजनिक बांधकाम पाणि पुरवठा व स्वच्छता विषयक माहिती. सामाजिक क्षेत्रे व सामूहिक सेवा अंतर्गत शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, महिला व बालविकास, गृहनिर्माण, सामाजिक न्याय, अल्पसंख्याक विकास, मदत व पुनर्वसन विषयीची माहिती व आकडेवारी. योजनांविषयी आकडेवारी मध्ये विविध विकास योजना, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना बाबतची आकडेवारी. संकीर्ण मध्ये न्याय व प्रशासन, माहिती व जनसंपर्क, निवडणुकीबाबत, वित्त, पर्यटन बाबत आकडेवारी शेवटच्या विभागात जनगणना, कृषी गणना, पशु गणना व आर्थिक गणनेबाबतची आकडेवारी तसेच जिल्ह्यातील वैशिष्ट्यपूर्ण  माहिती उपलब्ध आहे. यावर्षी नव्याने पहिल्यांदाच  जिल्ह्यातील धान उत्पादनाबाबतची माहिती तसेच जिल्ह्यातील तेंदूपान संकलनाची माहिती यात समाविष्ट करण्यात आली आहे.

सदर पुस्तिकेचा उपयोग विद्यार्थी, संशोधक, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार व सामान्य जनतेला निश्चितच होईल अशी अपेक्षा आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version