अमरावतीत दोन मजली इमारत कोसळल्याची दुर्दैवी घटना; चौघांचा मृत्यू

0
16

अमरावती- शहरातील प्रभात चौक या अतिशय वर्दळीच्या ठिकाणी दुपारच्या सुमारास दोन मजली इमारत कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेच चौघांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक आहे. तसेच ढिगाऱ्याखाली आणखी काही लोक अडकले असल्याची शक्यता आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि अमरावती महापालिकेचे बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले असून ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.

अमरावती शहरातील प्रभात टॉकिज जवळील जीर्ण झालेली दुमजली इमारत रविवारी दुपारी कोसळली. या इमारतीच्या ढिगाऱ्याखालून चार मृतदेह काढण्यात आले आहेत. महापालिककेने सुमारे चार वर्षांपूर्वी ही इमारत जीर्ण झाल्याने संबंधितांना ती पाडण्याची नोटीस बजावली होती. दरम्यान गेल्या दोन दिवसांपासून ही इमारत पाडण्याचे काम सुरू होते. रविवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास इमारतीचा पहिला माळा अचानक कोसळला.

दरम्यान, तीन जेसीबीच्या सहाय्याने ढिगारा उपसण्याचे काम सुरू आहे. महापालिकेची अग्निशमन आणि आपातकालीन यंत्रणा घटनास्थळी पोहचली असून मदत व बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. घटनास्थळी मोठी गर्दी झाल्याने बचावकार्यात अडथळे देखील निर्माण झाले आहेत. राजेंद्र लॉज या नावाने ओळखली जाणारी ही इमारत बरीच जुनी होती. ती जीर्ण झाल्याचा फलकही महापालिकेने या ठिकाणी लावला होता. या व्यावसायिक इमारतीच्या पहिल्या माळ्याचे बांधकाम पाडण्याचे काम सुरू होते, त्याचवेळी ही इमारत कोसळली. तळमजल्यावर बॅग विक्रीचे दुकान होते. आमदार सुलभा खोडके यांनी घटनास्थळी पोहचून बचाव कार्याची पाहणी केली.