संजयनगरवासीयांच्या हक्काच्या घराची स्वप्नपूर्ती – राधाकृष्ण विखे पाटील

0
17

स्थायी भूमी पट्टे वाटप

घरकुलासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही

गोंदिया दि. 01 : स्वतःचे हक्काचे घर असावे असे प्रत्येक नागरिकाचे स्वप्न असते आज ते पूर्ण होत आहे. सर्व नागरिकांना घर मिळावे हे शासनाने धोरण असून ज्यांना घरे मिळाली नाहीत अशा शहरातील नागरिकांना घरे मिळण्याचा प्रस्ताव तातडीने पाठवावा यावर शासन तात्काळ निर्णय घेईल असा विश्वास राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. गोंदिया नगरपालिकेच्या वतीने आयोजित सर्वांना घरे 2022 अंतर्गत स्थायी भूमी पट्टे वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमात संजयनगर मधील अतिक्रमण धारकांना प्रातिनिधिक स्वरूपात त्यांच्या हस्ते स्थायी पट्टे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार सुनील मेंढे होते. आमदार विनोद अग्रवाल, जिल्हाधिकारी नयना गुंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील, सभापती संजय टेंभरे, माजी आमदार गोपालदास अग्रवाल, उपविभागीय अधिकारी पर्वणी पाटील, मुख्याधिकारी करणकुमार चव्हाण यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

प्रधानमंत्री घरकुल योजनेच्या कामाला गती द्या असे आवाहन करून श्री. विखे म्हणाले की, स्थायी पट्टयासाठी काही नागरिकांना अतिरिक्त 25 लाख रुपये द्यावे लागतात. हे शुल्क माफ करण्याचा प्रस्तावही शासनास पाठविण्यात यावा. अतिरिक्त शुल्क माफ करण्याचे शासनस्तरावर प्रयत्न करण्यात येतील. घरकुलचा विकास आराखडा तयार करावा निधी कमी पडू दिला जाणार नाही असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

मोरबी गुजरात येथे झालेल्या अपघातात व सोलापूर जिल्ह्यातील अपघातात मृत्यू पावलेल्या नागरिकांना उपस्थितांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

 सर्वांसाठी घर या योजनेअंतर्गत गरजूंना घर मिळावी यासाठी मोजणी व लेआऊट करून 333 घरांचा विकास आराखडा तयार करावा. हा आराखडा मंजूर करण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन खासदार सुनील मेंढे यांनी दिले. गौरीनगर मधील नागरिकांना सुद्धा लवकरात लवकर पट्टे वाटपाचे नियोजन करावे असे ते म्हणाले.

 आजचा दिवस संजयनगरवासीयांसाठी आनंदाचा दिवस आहे. येथील सर्वच नागरिकांना पट्टे मिळावे अशी विनंती आमदार विनोद अग्रवाल यांनी केली. गोंदिया शहरात दहा हजारावर अतिक्रमण धारक आहेत त्यांचे अतिक्रमण नियमित करून त्यांना पट्टे देण्यात यावे व न्याय द्यावा असे ते म्हणाले.

लाभार्थ्यांना स्वतः च्या हक्काची घर मिळणार आहेत. सर्वांना स्थायी पट्टे करण्यात येणार आहेत. संजयनगर मधील नागरिकांना शासनाच्या सोयी व सुविधांचा लाभ मिळणार आहे. नागरिकांनी शासनाच्या अन्य योजनांचा सुद्धा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी केले.

 नागरिकांना स्थायी पट्टे वाटपासाठी दिल्ली पर्यंत संघर्ष करावा लागला. येथे झुडपी जंगल होते. आता संजयनगर झुडपी जंगल मुक्त झाले आहे. आज पट्टे वाटप होत आहेत त्यामुळे येथील नागरिकांचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार असल्याचे गोपालदास अग्रवाल यांनी सांगितले. आता 140 लोकांना पट्टे देण्याचे काम आपल्याला करायचे आहे तसेच गावठाणा बाहेरील लोकांनाही पट्टे मिळावे असेही ते म्हणाले.

            संजयनगर मधील 333 नागरिकांचे अतिक्रमण नियमित करण्यात आल्याची माहिती करणकुमार चव्हाण यांनी प्रास्ताविकात दिली.

 गोंदिया शहर सुविधा विकास कार्यक्रमांतर्गत 3 कोटी 46 लाख रुपये किमतीच्या विकास कामांचे भूमिपूजन विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाच्या वतीने नगर भूमापन झालेल्यांना सनदचे वाटपही मंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. पाण्यात बुडून मरण पावलेल्या कारंजा भदरु टोला येथील दोन मुलांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून प्रत्येकी एक लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान वाटप करण्यात आले. यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांचे आभार करणकुमार चव्हाण यांनी मानले.