12 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतचे आयोजन

0
29

 गोंदिया दि. 10: राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली यांच्या आदेशान्वये महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई  व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गोंदिया तर्फे 12 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतचे आयोजन करण्यात आले आहे. ही राष्ट्रीय लोकअदालत जिल्हा न्यायालय गोंदिया व जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयात तसेच कौटुंबिक न्यायालय, गोंदिया येथे  आयोजित करण्यात आली आहे.

सदर राष्ट्रीय  लोक अदालतीमध्ये दिवाणी, मोटार अपघात दावा, भूसंपादन, किरकोळ दिवाणी अर्ज, तसेच  बॅंकांची प्रकरणे इत्यादी न्यायालयात प्रलंबित असलेली प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहेत. त्याचबरोबर प्रलंबित तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे सदर लोकन्यायालयात ठेवण्यात येणार आहेत.

याशिवाय, सदर लोक अदालतीत विद्युत कंपनी, विविध बॅंका, नगरपालीकेचे थकीत मालमत्ता कराची प्रकरणे, घरकुल योजनेची प्रकारणे तसेच ग्रामपंचायतीचे थकीत मालमत्ता कराची व भारत संचार निगम लि. यांचे थकीत बाकी  येणे  बाबतची दाखल पुर्व प्रकरणे तसेच, विविध मोबाईल कंपन्यांचीही थकित रकमेबाबतची  प्रकरणे तडजोडीद्वारे निकाली काढण्यासाठी  ठेवण्यात येणार आहेत.

या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये जिल्हयातील सर्व विधीज्ञ आणि विविध विमा कंपनीचे अधिकारी, भूसंपादन अधिकारी, मनपा, महसुल विभागाचे अधिकारी यांचा सहभाग राहणार आहे. सदर राष्ट्रीय लोक अदालतीत मोठया संख्येने प्रकरणात तडजोड होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन प्रमुख जिल्हा न्यायाधीश, तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण ए. टी. वानखेडे, व सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण न्यायाधीश एस. व्ही. पिंपळे यांनी केले आहे. सर्व पक्षकारांनी येताना त्यांनी आपले अधिकृत ओळखपत्र घेवून येणे गरजेचे  असुन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. तसेच सर्व संबंधित पक्षकारांनी 12 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये प्रकरणे ठेवुन आलेल्या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.