नवीन मतदार नोंदणीकरिता 6 व 7 डिसेंबर रोजी विद्यार्थ्यांसाठी विशेष शिबिराचे आयोजन

0
12
  • जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली महाविद्यालयातील प्राचार्यांची बैठक

भंडारा, दि. 01 : भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 1 जानेवारी 2023 या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत  30 नोव्हेंबर 2022 रोजी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात महाविद्यालयांच्या प्राचार्यांची बैठक घेतली.

महाविद्यालयामधील ज्या विद्यार्थ्यांचे वय  दिनांक 1 जानेवारी 2023 रोजी 18 वर्ष (जन्म दिनांक 31 डिसेंबर 2004 नंतर) पूर्ण होत आहे, अशा विद्यार्थ्यांची सर्व महाविद्यालयांनी मतदार नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकात्यांनी केले. नवीन मतदार नोंदणी मोठ्या प्रमाणात व्हावी, यासाठी भारत निवडणूक आयोगाने दिनांक 1 जानेवारी 2023, 1 एप्रिल 2023, 1 जुलै 2023 व 1 ऑक्टोंबर 2023 ला मतदार नोंदणी कार्यक्रम जाहीर केला आहे. ज्या नवीन मतदारांनी वयाची 18 वर्ष पूर्ण केली आहे, असे तरुण- तरुणी मतदार यादीत आपले नाव सामविष्ट करण्यास पात्र राहील. त्यांच्याकडून मतदार नोंदणी करून घेण्याबाबत विषेश लक्ष देण्यात येणार आहे.

वयाची 17 वर्ष पूर्ण झालेले मतदार विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमामध्ये अर्ज क्रमांक 6 भरून आगावू मतदार नोंदणी करू शकतात. परंतू वयाची 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतरच त्यांचे नाव यादीत समाविष्ट करण्यात येणार आहे. दिनांक 9 नोव्हेंबर 2022 रोजी जिल्ह्यात वयाची 18 ते 19 वर्ष पूर्ण केलेल्या नवीन मतदारांची एकत्रीकृत प्रारूप मतदार यादी प्रसिध्दी करण्यात आली. त्यामध्ये तुमसर तालुक्यात 2 हजार 303 नवीन मतदार, भंडारा तालुक्यात 2 हजार 145 नवीन मतदार व साकोली तालुक्यात 1 हजार 950 नवीन मतदार, असे जिल्ह्यात एकूण 6 हजार 398 नवीन मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे.