गावाचा कायापालट करण्याची ऊर्जा युवाशक्तीमध्ये : देवानंद शहारे

0
6

चिरेखनीत आदिवासी-गोवारी शहीद स्मारकाचे उद्घाटन

तिरोडा : सन 2020 व 2021 या दोन वर्षात कोरोना विषाणूने संपूर्ण जग आपल्या विळख्यात घेतले होते. सर्वत्र भयावह वातावरण पसरले होते. जगाची आर्थिक स्थिती व लोकांचे आर्थिक व्यवहार प्रभावित झाले होते. मात्र त्यानंतर लगेच दुसर्‍या वर्षी सन 2022 मध्ये ग्राम चिरेखनी येथील युवावर्गाने कोणत्याही शासकीय निधीचा वापर न करता श्रमदान व जमा केलेल्या पैशातून गावात चार ठिकाणी महत्वाचे बांधकाम केले. गावाचा कायापालट करण्याची ऊर्जा चिरेखनी गावातील युवावर्गामध्ये आहे, असे प्रतिपादन पत्रकार, भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते देवानंद शहारे यांनी केले.

कायापालट

आदिवासी गोवारी समाज संघटना चिरेखनीच्या वतीने आदिवासी-गोवारी शहीद स्मारकाचे उद्घाटन, 114 आदिवासी-गोवारी शहीद बांधवांना श्रद्धांजली व महामानव बिरसा मुंडा यांची जयंती या तिन्ही संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

देवानंद शहारे पुढे म्हणाले, ग्राम चिरेखनी येथे सन 2022 मध्ये सर्वप्रथम चक्रवर्ती सम्राट राजाभोज यांच्या पुतळ्याची स्थापना व अनावरण 14 मार्च रोजी करण्यात आले. त्यानंतर नालंदा बुद्ध विहार समितीने 14 एप्रिल रोजी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची स्थापना व अनावरण सोहळा घेतला. त्यानंतर आता 25 नोव्हेंबर रोजी आदिवासी-गोवारी समाज संघटनेने 114 शहीद बांधवांच्या स्मृतीत शहीद स्मारकाचे बांधकाम पूर्ण करून उद्घाटन केले. आणि चौथे महत्वाचे काम म्हणजे परमात्मा एक सेवक संघाने तब्बल 3 माळ्याची भव्य इमारत उभारली. या बैठक सभागृहाचे काम अंतिम टप्प्यात असून लवकरच या इमारतीचे लोकार्पन होईल व त्यातून संपूर्ण गावात व्यसनमुक्ती व अंधश्रद्धा निर्मूलनाचे धडे दिले जातील.

असे सांगून ते पुढे म्हणाले, कोणत्याही शासकीय निधीचा वापर न करता चिरेखनी गावासाठी झालेली ही चार कामे अत्यंत महत्वाची असून त्यामुळे गावाच्या विकासाच्या दृष्टीने थोडी भर पडली. त्यामुळे गावातून एक चांगला संदेश बाहेर जाईल. गावात सामाजिक सलोखा, एकता व बंधुभाव नांदावे, असे बोलून त्यांनी समाज या शब्दाचे संपूर्ण विश्लेषण त्यांनी गावकर्‍यांना सांगितले.

कार्यक्रमाचे उद्घाटन आदिवासी गोंड गोवारी सेवा मंडळाचे उपाध्यक्ष नामदेव ठाकरे (तुमसर) यांच्या हस्ते, आदिवासी गोवारी समाजाचे तिरोडा तालुका अध्यक्ष बळीराम राऊत यांच्या अध्यक्षतेत करण्यात आले. याप्रसंगी प्रामुख्याने माजी सरपंच घनश्याम पारधी, माजी ग्रामपंचायत सदस्य नितेश कटरे, माजी ग्रामपंचायत सदस्य संजय पारधी, नालंदा बुद्ध विहार समितीचे अध्यक्ष मनोज जांभूळकर, सामाजिक कार्यकर्ते राजू ठाकरे, संजय कोटांगले, अंजु रहांगडाले, आकाश बिसेन व इतर मान्यवर उपस्थित होते.

कायापालट

प्रास्ताविक मांडताना माजी सरपंच घनश्याम पारधी व मंचावर उपस्थित मान्यवर.

याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी महामानव बिरसा मुंडा, 114 शहीद बांधव यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. तसेच शहिदांना मानवंदना अर्पण करण्यात आली.

प्रास्ताविक घनश्याम पारधी यांनी मांडले. संचालन व आभार संजय राऊत यांनी केले. कार्यक्रमासाठी आदिवासी गोवारी समाज संघटना चिरेखनीचे अध्यक्ष संजय राऊत, उपाध्यक्ष भरतलाल नेवारे, सचिव आनंदराव ओघरे, सदस्य दिलीप ठाकरे, छन्नु ठाकरे, रामचंद्र नेवारे, संजय ओघरे, तुलसीदास राऊत, कुवरलाल चचाने, लिखिराम ओघरे, भगवनदास ओघरे, राजु ओघरे, देविदास ठाकरे, रविन्द्र फुन्ने, माधोराव राऊत यांनी सहकार्य केले. या वेळी मोठ्या संख्येने आदिवासी गोवारी बांधव, भगिनी व गावकरी उपस्थित होते.