भारत स्काऊट अँड गाईड तर्फे आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण व रंगीत तालीम

0
16

जिल्ह्यातील 107 शिक्षकांनी घेतले आपत्ती व्यवस्थापनाचे धडे

अग्नि सुरक्षा व पूर परिस्थितीचे प्रात्यक्षिक

गोंदिया:(दि.14) भारत स्काऊट अँड गाईड, शाखा गोंदिया तर्फे अग्नि सुरक्षा व पूर परिस्थितीचा सामना या विषयावर माहिती व प्रात्यक्षिकेद्वारे जिल्ह्यातील 107 शिक्षकांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देण्यात आले. आपत्तीच्या वेगवेगळ्या घटनेमध्ये जीवित व वित्तीय हानीचे प्रमाण कमी करून विविध आपत्ती पासून स्वतःचे व इतरांचे संरक्षण कसे करावे ? या विषयावर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, गोंदियातर्फे दि.09 डिसेंबर 2022 रोजी जिल्हा क्रिडा संकुल येथे प्रशिक्षण कार्यक्रमात प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.

यावेळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे, अग्निशमन अधिकारी लोकचंद भेंडारकर, जयंत शुक्ला, गाईड विभागाच्या शिबिर प्रमुख चेतना ब्राम्हणकर, सहाय्यक शिबिर प्रमुख विद्या खेडूलकर, नेहा खंडेलवार, स्काऊट विभागाचे शिबिर प्रमुख गजानन गायकवाड, सहाय्यक शिबिर प्रमुख विठोबा भगत, सत्यशिल पाटील, पराग खुजे, मदनगोपाल नंदनवार प्रामुख्याने उपस्थित होते.

गोंदिया भारत स्काऊटस् आणि गाईडस् जिल्हा कार्यालय व शिक्षण विभाग (प्राथमिक/माध्यमिक) जि. प. गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने स्काऊट मास्टर/गाईड कँप्टन प्राथमिक प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. 05 ते 11 डिसेंबर 2022 या कालावधीत आयोजित करण्यात आले होते. सदर प्रशिक्षण शिबिरात 50 स्काऊट मास्टर व 56 गाईड कँप्टन व 1 केंद्र प्रमुख असे एकूण 107 शिक्षकांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला.

शालेय आपत्ती व्यवस्थापनात शिक्षकांची भूमिका व कृति या विषयावर रंगीत तालीम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबिरात उपस्थित सर्व शिक्षकांना भूकंपाची माहिती व दरम्यान करावयाच्या कृती इत्यादी बाबत सविस्तर माहिती देण्यात आली व मॉकड्रिलच्या माध्यमातून स्वतःचे संरक्षण कसे करावे? याबाबत प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.

दैनंदिन जीवनात आगीच्या अनेक घटनेमुळे जीवित व वित्तीय हानीच्या घटना घडतात. त्यामुळे आगीपासून सुरक्षा व बचाव या विषयावर रंगीत तालीम घेऊन अग्निशमन यंत्राचा वापर कसा करावा? आग आटोक्यात आणण्यासाठी काय करावे? याबाबतची माहिती व प्रात्यक्षिक रंगीत तालीमेद्वारे देण्यात आले.

मान्सून कालावधीत पावसाळ्यात पूरपरिस्थिती कालावधीत शोध व बचाव कामात उपयोगी रबर/फायबर बोटी, लाइफ जॉकेट, लाइफ बॉय, इमरजेंसी लाईट, OBM मशीन, टाकाऊ वस्तूंपासून तयार करण्यात आलेले फ्लोटिंग डिवाइस, सर्चलाईट, सेटेलाईट फोन, मेगाफोन इत्यादी सर्व साहित्यांची माहिती उपस्थित शिक्षकांना देण्यात आली.

सदर कार्यक्रमात अग्निशमन विभागाचे मोहनीश नागदवणे, महेंद्र बांते, शहबाज सय्यद, मुकेश ढाकेर, सुमित बिसेन, आमिर खान, अजय रहांगडाले, सत्यम बिसेन, तथा शोध बचाव पथकाचे सदस्य नरेश उईके, राजकुमार खोटेले, जसवंत रहांगडाले, रविंद्र भांडारकर, दिनू दिप, राजाराम गायकवाड, महेंद्र ताजने, दुर्गा प्रसाद गंगापारी, मनोज केवट, (चालक) मंगेश डोये, गृहरक्षक इंद्रकुमार बिसेन, पवन जगणे, प्रामुख्याने उपस्थित होते.