शेतकऱ्यांनी राष्ट्रीय कृषि विकास योजना-प्रति थेंब अधिक पीक योजनेचा लाभ घ्यावा-एकनाथ डवले, प्रधान सचिव कृषि विभाग

0
9

गोंदिया दि.28 : कृषि विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी 25 डिसेंबर 2022 रोजी तिरोडा तालुक्यातील चांदोरी/बु. येथे भेट दिली. या दरम्यान शेतकरी प्रेमलाल गणपत कावळे यांच्या शेतात प्लास्टिक मल्चिंग पेपरवर केलेली मिरची पीक लागवडची पाहणी करुन शेतकऱ्यांशी संवाद साधला असता शेतकऱ्याने कृषि विभागामार्फत राष्ट्रीय कृषि विकास योजना-प्रति थेंब अधिक पीक (सुक्ष्म सिंचन) योजना व एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान योजना अंतर्गत ठिबक सिंचन संचाचा लाभ घेतल्याचे अभिप्राय व्यक्त केले. श्री. डवले यांनी दौऱ्यादरम्यान यांत्रिकीकरण योजनेतून लाभ देण्यात आलेले ट्रॅक्टर, रोटावेटर व इतर औजारांची पाहणी केली. शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनामुळे पीक उत्पादनात वाढ झाल्याचे मत व्यक्त केले. जिल्ह्यातील इतरही शेतकऱ्यांनी कृषि विभागाच्या राष्ट्रीय कृषि विकास योजना-प्रति थेंब अधिक पीक (सुक्ष्म सिंचन) योजनेअंतर्गत जास्तीत जास्त ठिबक सिंचन संच/तुषार सिंचन संच घटकाचा लाभ घेणेबाबत आवाहन केले.

          यावेळी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी हिंदुराव चव्हाण, तालुका कृषि अधिकारी डी.एल.तुमडाम, मंडळ कृषि अधिकारी पंकज जिभकाटे, कृषि पर्यवेक्षक श्री. चौधरी, कृषि सहाय्यक श्री. रिनाईत व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.