पेंशन घोटाळ्याप्रकरणी सरिता नेवारे निलंबित

0
21

नागपूर, दि. 28 : अलीकडे विविध वर्तमानपत्रात ‘पावणेदोन कोटींच्या घोटाळयात एकालाही नोटीस नाही’, अशा मथळ्याखाली बातमी प्रसिध्द झाली आहे. याबाबत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांनी खुलासा सादर केला आहे.पंचायत समिती, पारशिवनी येथील सरिता नेवारे (निलंबित) कनिष्ठ सहाय्यक हया अनधिकृत गैरहजेरी व सेवा निवृत्ती शिक्षकांच्या नियमबाह्यरित्या सेवानिवृत्ती देयके सादर करणे याकारणास्तव दिनांक 13 सप्टेंबरला ज्ञापन बजावून विभागीय चौकशी सुरु करण्यात आलेली आहे.

पारशिवनी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या 28 ऑक्टोबर पत्रान्वये श्रीमती सरिता चंद्रशेखर नेवारे यांनी स्वतःचे नावे, पतीचे व इतर परिचीत व्यक्तीच्या बँक खात्यामध्ये निवृत्ती वेतनाची रक्कम वळती करुन शासकिय निधीचा अपहार केल्याचे कारणास्तव दिनांक 28 ऑक्टोबर रोजी त्यांना सेवेतून निलंबीत करण्यात आलेले आहे. तसेच त्रिसदस्यीय चौकशी समिती नियुक्ती करण्यात आलेली होती. या त्रिसदस्यीय समितीच्या अहवालानुसार दोषी आढळून आलेल्या आहे.

त्यांचे विरूध्द पोलिस स्टेशन, पारशिवनी येथे 16 नोव्हेंबरला फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर फौजदारी प्रकरण आर्थिक गुन्हे शाखा नागपूर यांचेकडे पुढील तपास करण्याकरिता वळती करण्यात आलेले आहे. श्रीमती नेवारे यांना अटक करण्यात आलेली असून अदयापही जामिन मिळालेला नसून पुढील तपास सुरू आहे. तसेच सरिता नेवारे कनिष्ठ सहाय्यक, पंचायत समिती, पारशिवनी यांचे विरूद्ध कार्यालयाकडून दिनांक 16 डिसेंबरला ज्ञापन बजाविण्यात आलेले असून विभागीय चौकशी सुरू करण्यात आलेली आहे. त्यांचेविरुध्द कार्यालयामार्फत पुढील प्रशासकीय कार्यवाही सुरू आहे. तसेच तत्कालीन संबंधित जबाबदार अधिकारी व कर्मचारी यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेली आहे.

वित्त विभाग, जिल्हा परिषद, नागपूर यांचेकडून सेवा निवृत्ती वेतन अदा करण्याबाबत उपाययोजना व कार्यपध्दतीबाबत परिपत्रक काढण्यात आलेले आहे. सदर प्रकरणी नियमानुसार विभागाकडून कार्यवाही सुरू आहे, असे खुलाशात नमूद केले आहे.