वीज कर्मचारी बुधवारपासून संपावर

0
25

नागपूर-अदानी इलेक्ट्रिकल या कंपनीने महाराष्ट्र सरकारच्या अधिकार क्षेत्रातील वीज कंपनीला समांतर नवीन लायसंसी स्थापित करून वीज ग्राहकांचे क्षेत्र महावितरण कंपनीऐवजी अदानी इलेक्ट्रिकल कंपनीला हस्तांतरित व्हावा म्हणून महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाकडे अर्ज करून तसा परवाना मागितला आहे. खासगी कॉर्पोरेट घराण्याने (अदानी) पूर्णत: औद्योगिक विकास झालेल्या व भविष्यात होणार्‍या विभागावर जास्तीत जास्त नफा कमावण्याच्या उद्देशाने समांतर लायसन्सीची मान्यता मिळावी म्हणून अर्ज केला. या परवान्याला वीज कर्मचारी संघर्ष समितीने विरोध केला असून, येत्या बुधवारपासून अधिकारी, कर्मचारी संपावर जाणार आहे.
महावितरण ही आशिया खंडातील सर्वात मोठी व कार्यक्षम ठरलेली कंपनी असून, केंद्र सरकारने कंपनीच्या एकूण कार्यक्षमता व कारभाराचे परीक्षण करून या कंपनीला अनेक पारितोषिके बहाल केली आहेत. ज्या कंपनीने २0२१-२२ या वर्षात १३५ कोटी रुपयांचा नफा कमाविला अशा कंपनीच्या महसुलाचा उच्चांक असलेला व ज्या ठिकाणी कृषी ग्राहकच नाही, असा प्रदेश खासगीकरणाकरिता निवडला आहे. या कृतीला संघर्ष समितीमधील सर्व संघटनांचा तीव्र विरोध आहे. महावितरण कंपनी मिळवत असलेला नफा राज्यांच्या हिताकरिता, विकासाकरिता वापरला जातो तर अदानी वीज ग्राहक व जनतेची सेवा करण्याकरिता नव्हे तर जास्तीत जास्त नफा कमविण्याच्या उद्देशाने व तो नफा व्यक्तिगत लाटण्याच्या उद्देशाने या क्षेत्रात येत आहे. या पद्धतीने खासगीकरण झाले तर शासन व महावितरण कृषी व घरगुती वीज ग्राहकांना स्वस्त दरांत वीज देतो ती क्रॉस सबसिडी अदानीच्या भागातील शून्य झाल्यामुळे त्याचा वीजदरावर परिणाम होऊन विजेचे दर वाढतील व क्रास सबसिडी बंद झाल्याने घरगुती ग्राहक, दुर्बल घटकांना स्वस्त दरात वीज देणे अशक्य होणार आहे. शासनाच्या या खासगीकरण धोरणाचा विरोध करण्याकरिता वीज उद्योगातील ३0 संघटनांचे ८६ हजार कर्मचारी, अधिकारी, अभियंते हे ४ ते ६ जानेवारीपर्यंत संपावर जाणार आहे. नागपूर ग्रामीण व नागपूर शहर भागातील वितरण, पारेषण कंपनीतील सर्व कर्मचारी, अधिकारी, अभियंते हे संविधान चौक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाजवळ जमा होऊन आंदोलन करतील.