आदिवासींनी विकसित केलेल्या तंत्राचा उपयोग शेती आणि औषध निर्मिती क्षेत्रात व्हावा – डॉ. विजयलक्ष्मी सक्सेना

0
11

नागपूर,4:जैवविविधता,नैसर्गिक संपदेचे जतन व संरक्षण करणाऱ्या आदिवासी समाजाने विकसित केलेल्या तंत्राचा उपयोग शेती आणि औषधनिर्माण कार्यात व्हावा, असे आवाहन राष्ट्रीय विज्ञान काँग्रेसच्या अध्यक्ष डॉ. विजयालक्ष्मी सक्सेना यांनी आज येथे केले.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात सुरु असलेल्या 108 व्या भारतीय विज्ञान काँग्रेसमध्ये शहीद बिरसा मुंडा सभागृहात आदिवासी विज्ञान काँग्रेसचे उद्घाटन डॉ. सक्सेना यांच्या हस्ते  झाले. भारतीय विज्ञान काँग्रेसचे महासचिव डॉ.ए. रामकृष्ण, नागपूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ. संजय दुधे,अधिष्ठाता डॉ. राजू हिवसे आणि आदिवासी विज्ञान काँग्रेसचे संयोजक डॉ.श्याम कोरेट्टी मंचावर उपस्थित होते.

डॉ. विजयलक्ष्मी म्हणाल्या, देशात 700 पेक्षा अधिक आदिवासी जमाती आणि त्यांच्या समृद्ध बोली भाषा आहेत. या जमातींनी स्वातंत्र्य चळवळीत मोलाचे योगदान दिले आहे. सेवा जोहार ब्रीद मानून  जल, जंगल आणि जमिनीच्या संरक्षण,संवर्धनात मोलाचे योगदान दिले आहे. या सर्व योगदानाची जाणीव ठेवून भारतीय विज्ञान काँग्रेसने प्रथमच आदिवासी विज्ञान काँग्रेसचा समावेश केला आहे सार्थ अभिमान असल्याचे डॉ.सक्सेना यांनी नमूद केले.

निसर्गाच्या सानिध्यात विविध अडचणींचा सामना करत आयुष्याची वाटचाल करणाऱ्या आदिवासींनी स्वत:चे तंत्र विकसित केले. त्यांनी शेतीत केलेले प्रयोग वाखानण्यासारखे आहेत. जैवविविधतेने परिपूर्ण निसर्गातील वनौषधींचा शोध व त्याचा प्रत्यक्ष वापर यामध्येही आदिवासींनी आघाडी घेतली आहे. शेती आणि औषधी अशा दोन्ही क्षेत्रात या जमातींनी  विकसित केलेल्या तंत्राचा उपयोग होवू शकतो. वैज्ञानिकांनी या दिशेने कार्य करावे,असे आवाहन त्यांनी केले. मातृसत्ताक कुटुंब व्यवस्थेमुळे  आदिवासी समाजातील महिलांचा या जमातीच्या विकासात सहभाग राहिला आहे. देशाच्या विज्ञान प्रगतीतही या महिलांना सामावून घेण्यासाठी प्रयत्न गरजेचे असल्याचे डॉ. सक्सेना यांनी नमूद केले.

डॉ.ए. रामकृष्ण,  डॉ. संजय दुधे आणि डॉ.श्याम कोरेट्टी यांनीही उपस्थितांना संबोधित केले.