आरोग्य विभागामार्फत बेटी बचावो बेटी पढावो ची जनजाग्रुती

0
28

गोंदिया- केंद्र शासन व एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी सर्व जिल्ह्यांना १३ जानेवारी रोजी पत्र पाठवून १८ ते २४ जानेवारी दरम्यान बेटी बचावो बेटी पढावो अभियानाची जनजाग्रुती उपक्रम राबवण्याचे निर्देश दिलेले आहेत. त्या अनुषंगाने आरोग्य विभागामार्फत गोंदिया जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्थांद्वारे कार्यक्षेत्रातील गावांमध्ये विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन वानखेडे यांनी दिली आहे.
मुलींच्या जन्माचा टक्का वाढण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृतीची आवश्यकता लक्षात घेऊन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटिल यांनी १८ ते २४ जानेवारी दरम्यान गोंदिया जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी बेटी बचाओ, बेटी पढाओ जनजागृतीपर कार्यशाळेचे आयोजन करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. त्यात प्रामुख्याने गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्याविषयी नागरीकांना माहिती देवून समुपदेशन करावे, मुलींच्या जन्माचे स्वागत या विषयावर व्याख्याने, चर्चासत्र, गटचर्चा, आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे, गावातील एका मुलीवर शस्त्रक्रिया करून घेतलेल्या जोडप्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात यावा असे विविध उपक्रम राबविण्याच्या सुचना त्यांनी सर्व विभाग प्रमुखांना दिल्या आहेत. गोंदिया जिल्ह्यात १000 मुलांमागे ९६६ मुलींचे प्रमाण असून सध्या मुलींचा जन्मदर २४ ने कमी असल्यामुळे भविष्यात पुढील पिढीला त्याची मोठी किंमत मोजावी लागणार असल्याची माहीती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटिल यांनी दिली आहे.
त्यामुळे सर्व लोकांनी ठोस पावले उचलून मुलीचा जन्म झाल्यास नाविन्यपूर्ण उपक्रम राबवुन पोकळी कमी करण्यासाठी शासन मार्गदर्शक सुचनांचे पालन करणे आवश्यक आहे.मुलगी ही वंशाचा दिवा असुन तो आयुष्यात सतत पेटत ठेवणे महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.हे एका व्यक्तिचे काम नसुन सर्व विभागांनी सामुहिकपणे काम करणे गरजेचे असल्याचे त्यांनी ह्या वेळेस सांगितले.
१८ पासून आरोग्यवर्धिनी केंद्रातील समुदाय आरोग्य अधिकारी ,आरोग्य सेवक, आरोग्य सेविका व आशा सेविका हे कार्यक्षेत्रातील उपकेंद्र,शाळा, ग्रामपंचायत, सरकारी कार्यालय, येथे जाऊन बेटी बचावो बेटी पढावो बाबतची प्रतिज्ञा घेऊन लोकांना त्याचे महत्त्व पटवून देण्यात येत आहे.
त्यात प्रामुख्याने मुलगा व मुलगी समानता,भ्रुण हत्या, गर्भलिंग निदान कायदा ,मुलीच्या शैक्षणिक, सामाजिक ,राजकीय, आर्थिक समानतेचे महत्व, लिंग आधारित लिंग निवड निर्मुलन करणे, मुलींचे शिक्षण हि काळाची गरज , किशोरवयीन आरोग्य, यावर चर्चासत्र,गटसभा घेवुन नाविण्यपुर्वक उपक्रम राबवुन लोकांमध्ये जनजागृती आरोग्य विभागामार्फत करण्यात येत असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिनेश सुतार यांनी दिली आहे.
एच.एम.आय.एस. अहवालाच्या रिपोर्टनुसार आपल्या जिल्ह्यातील तालुका निहाय १000 मुलांमागे लिंग प्रमाण पुढिल प्रमाणे सडक अर्जुनी ११८४, तिरोडा (शहरी व ग्रामीण) १0२४, गोरेगाव ९८६, अर्जुनी मोरगाव ९७३ , गोंदिया (शहरी व ग्रामीण) ९५९, सालेकसा ९५१, देवरी ९५१ , आमगाव ९२५ . ज्या तालुक्यांचे मुलींचे लिंग गुणोत्तर १000 पेक्षा जास्त आहे त्यांचे ठिक परंतु ज्यांचे प्रमाण कमी आहे तेथील तालुका प्रशासनामधील अधिकारी व कर्मचारी यांनी त्याचे महत्व गावपातळीवर पटवुन जनजाग्रूती करुन कठोर पावले उचलले गेले पाहीजेचा निवार्ळा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमरिष मोहबे यांनी दिला आहे.