13  वा राष्ट्रीय मतदार दिवस उत्साहात साजरा,मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांचा सत्कार

0
4
????????????????????????????????????

वाशिम, दि. 25  : 13 व्या राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्ताने आज 25 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन सभागृहात जिल्हाधिकारी कार्यालय व तहसिल कार्यालय, वाशिम यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, पर्यवेक्षक आणि रांगोळी स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी सभागृहात उपस्थितांनी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त प्रतिज्ञा वाचन केले. चेतन सेवांकुर ऑर्केस्ट्राच्या अंध कलावंतांनी देशभक्ती गीत सादर करुन उपस्थितांकडून टाळयांची दाद घेतली. शाहिर संतोष खडसे व त्यांच्या सहकारी कलावंतांनी मतदार प्रबोधन गीत सादर केले.

        कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. हे होते. प्रमुख अतिथी म्हणून सहाय्यक जिल्हाधिकारी श्रीमती मिन्नु पी.एम., अपर जिल्हाधिकारी शहाजी पवार, ज्येष्ठ साहित्यिक पदमश्री नामदेव कांबळे व उपविभागीय अधिकारी नितीन चव्हाण यांची मंचावर उपस्थिती होती.

         श्री. षण्मुगराजन म्हणाले, जिल्हयात मतदार नोंदणी आणि मतदार जागृतीचे काम मागील दोन वर्षात प्रभावीपणे करण्यात आले आहे. या कामाची दखल घेऊन राज्य निवडणूक आयोग जिल्हयाला यावर्षी देखील सन्मानित करीत आहे. नवीन मतदारांनी मतदार नोंदणी केल्यामुळे त्यांना मतदार ओळखपत्र देण्यात आले आहे. मतदार जनजागृती करण्यात येत असल्यामुळे भविष्यात नवीन मतदार देखील वेळीच मतदार नोंदणी करुन मतदार ओळखपत्र प्राप्त करुन घेतील आणि आगामी निवडणूकीत ते मतदानाचा हक्क बजावतील. पुर्वी मतदान प्रक्रीया ही मतपत्रिकेच्या माध्यमातून करण्यात येत होती. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन आता इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशिन अर्थात इव्हीएमच्या माध्यमातून मतदान करण्यात येत आहे. जिल्हयात मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी मतदार नोंदणीत चांगले काम केल्याचे त्यांनी सांगितले.

         श्री. कांबळे म्हणाले, एका मतावर आपले भविष्य असते. मतदान करतांना जाणीवपूर्वक व जबाबदारीने मतदान केले पाहिजे. मतदारांची निष्ठा ही विचारावर असली पाहिजे. राजकारणाचे शुध्दीकरण होण्याची आज आवश्यकता आहे. सुधारणेची सुरुवात प्रत्येकाने स्वत:पासून केली पाहिजे. मतदारांमध्ये जाणीव जागृती निर्माण होण्याची आवश्यकता त्यांनी विषद केली.

         यावेळी मतदार नोंदणीमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी व पर्यवेक्षक यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये श्रीकृष्ण कड, सुनिता कांबळे, पांडुरंग महाले, भागवत कव्हर, लिना पट्टेबहादूर, दिलीप शिंदे, संजय सुरेकर, गजानन शिंदे, सुवर्णा काडोळे, निता वाढे, लक्ष्मी गंगावणे, शामराव आडे, राधा चिवणकर, निरंजन उईके यांचा समावेश आहे. रांगोळी स्पर्धेतील विजेत्या कल्पना ईश्वरकर, अर्चना अंभोरे, सीता मैसाने यांचा देखील मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.

         कार्यक्रमाला जिल्हा नियोजन अधिकारी सुनिता आंबरे, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त सुनंदा बजाज, जिल्हा महिला बाल विकास कार्यालयाचे परिवीक्षा अधिकारी श्री. पडघान यांचेसह जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागाचे अधिकारी-कर्मचारी, शहरातील विविध महाविद्यालयाचे विद्यार्थी व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांची मोठया संख्येने उपस्थिती होती.

         यशस्वीतेसाठी वाशिम तहसिलदार विजय साळवे, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी राजेश वजीरे, नायब तहसिलदार सुनिल घोडे, नायब तहसिलदार समाधान राठोड, निवडणूक विभागातील अतुल देशमुख, ज्ञानेश्वर अवधुत, अजय बांडे, अमित किल्लेदार व विद्या जगाडे यांनी परिश्रम घेतले.

          कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपविभागीय अधिकारी नितीन चव्हाण यांनी केले. संचालन प्रा. अनिल काळे यांनी तर उपस्थितांचे आभार अतुल देशमुख यांनी मानले.