Home विदर्भ लोकशाहीला सुदृढ करण्यासाठी मतदान करा

लोकशाहीला सुदृढ करण्यासाठी मतदान करा

0

गडचिरोली-संविधानाने नागरिक म्हणून वय वर्षे १८ पुर्ण झाल्यावर मतदानाचा अधिकार प्रत्येकाला दिला आहे, तो वापरून आपल्या लोकशाहीला अधिक सुदृढ करण्यासाठी नवमतदारांनी मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय मीणा यांनी केले.
राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्ययासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन भवन येथे बुधवार, २५ जानेवारी रोजी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी नवमतदारांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. तसेच मतदारांना राष्ट्रीय मतदार दिवसाच्या शुभेच्छा दिल्या व उपस्थितांच्याबरोबर मतदान करणेबाबत शपथ घेतली. जिल्हाधिकारी पुढे म्हणले, आजचा दिवस नविन मतदारांसाठी अभिमानाचा दिवस आहे. कारण, १ जानेवारी २0२३ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण होऊन मतदार म्हणून मतदार यादीत नाव नोंदविल्यामुळे स्वतंत्र भारताचा एक जागृत मतदार म्हणून शासन दरबारी आपली नोंद झालेली आहे. आज पासून यापुढे होणार्‍या लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद, नगर पंचायत व ग्रामपंचायत निवडणूकामध्ये मतदान करुन मतदानाच्या अधिकाराचा वापर करून वोट फॉर डेमॉक्रशी हे ब्रिदवाक्य आपल्या उराशी बाळगुन आपण भारत देशाची लोकशाही अधिक सुदृढ करण्यासाठी प्रयत्न कराल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
संविधानात उद्देशिकेची सुरूवातच आम्ही भारताचे नागरिक या वाक्याने होते. म्हणजेच नागरिक जो की मतदार आहे, त्याला देशाचे सरकार निवडण्याचा अधिकार दिला आहे. यावरून त्यांनी आपल्या भाषणात मतदारांचे महत्त्व विशद केले. मतदान प्रक्रिया ही आपल्या देशात एक मोठा उत्सव म्हणून पार पाडली जाते. त्या प्रक्रियेत मतदान करून आपला सहभाग सर्वांनी नोंदविणे आवश्यक आहे. मतदानादिवशी सुट्टी असते म्हणून कित्येक जण बाहेर फिरायला जातात. परंतु, जर सर्वांनी मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला तर आपण आपल्या निवडीचे शासन निवडू शकतो. यामुळेच खर्‍या अर्थाने लोकशाहीला आपण अधिक मजबूत बनवू असे त्यांनी यावेळी मत व्यक्त केले.
कार्यक्रमाला जिल्हाधिकारी संजय मीणा यांचेसह प्रमुख अतिथी म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद, प्रकल्प अधिकारी तथा सहा. जिल्हाधिकारी डॉ. मैनक घोष, समाज सेवक देवाजी तोफा, उप जिल्हा निवडणूक अधिकारी तथा अति. जिल्हाधिकारी धनाजी पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी निकाळजे, गडचिरोलीचे तहसीलदार महेंद्र गणवीर तसेच इतर विभागातील प्रमुख, अधिकारी, कर्मचारी वर्ग व इतर मान्यवर, नवमतदार, अपंग मतदार, शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते.

Exit mobile version