Home विदर्भ जल, जंगल व जमिनीचा वारसा जपण्याचा संकल्प करू या- जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे

जल, जंगल व जमिनीचा वारसा जपण्याचा संकल्प करू या- जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे

0
  • जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण
  • प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

        गोंदिया,दि.26 : प्रजासत्ताक दिन साजरा करतांना आपल्या कर्तव्याचे सदैव पालन करण्याचा संकल्प करु या. जल, जंगल व जमीनीचे जतन करु या. समाजात एकोपा व बंधूभाव वृध्दींगत करुया. आपल्या जिल्ह्याला वनाचा व जलाचा मोठा वारसा लाभला आहे, तो जतन करणे आपले कर्तव्य आहे. आपला वन व जलवारसा जपण्यासाठी आज प्रजासत्ताक दिनी संकल्प करु या, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी केले. पोलीस मुख्यालय येथे प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य समारोहात जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले या प्रसंगी ते बोलत होते.

         मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे, उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी, उपविभागीय अधिकारी पर्वणी पाटील, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.कुसूमाकर घोरपडे, जिल्हा प्रशासन अधिकारी करणकुमार चव्हाण यांचेसह शालेय विद्यार्थी व नागरीक बहुसंख्येने उपस्थित होते.

         स्वातंत्र्यानंतर घटना समिती स्थापन करण्यात आली. त्यामध्ये मसुदा समितीचे अध्यक्ष भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर होते. बाबासाहेबांनी देशाला एक आदर्श राज्यघटना दिली. 26 जानेवारी 1950 रोजी स्वीकारलेल्या राज्यघटनेत कोट्टयावधी देशवासियांच्या आकांक्षाचे प्रतिबिंब आहे. आदर्श राज्य घटनेमुळेच भारत देश सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक गणराज्य बनला असे ते म्हणाले.

          स्वातंत्र्य, समता, बंधूभाव व सर्वांसाठी समान न्याय या तत्वांशी बांधिलकी ठेवून आपण कल्याणकारी राज्याची संकल्पना मान्य केली व ती अंमलात आणली. राज्यघटनेमुळेच देशाला लोकशाही व्यवस्था मिळाली. जगातील श्रेष्ठ राज्यघटनांमध्ये आपल्या देशाच्या राज्यघटनेचा समावेश आहे. ही बाब सर्व भारतीयांसाठी अभिमानाची आहे. कोणत्याही प्रकारच्या जात, धर्म, लिंग व रंग भेदाशिवाय प्रत्येक नागरिकाला मुलभूत अधिकार आपल्याला घटनेने दिले आहेत.

          प्रजासत्ताक दिन साजरा करतांना मागे वळून पाहिले असता मागील 73 वर्षात आपल्या देशाने विविध क्षेत्रात लक्षणीय प्रगती केली आहे. कल्याणकारी राज्याची संकल्पना स्वीकारुन देशाने आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात मोठी झेप झेतली आहे. या काळात देशाने आरोग्य क्षेत्रात लक्षणीय प्रगती केली. विविध तंत्रज्ञानात आपला देश स्वयंपूर्ण झाला. शैक्षणिक व आर्थिक क्षेत्रात भारताने जगाचे लक्ष आपल्याकडे वेधले. सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रध्दा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता याद्वारे आपला देश प्रगतीची अनेक शिखरे सर करत आहे, असे जिल्हाधिकारी म्हणाले.

          पायाभूत सोई-सुविधा, रस्ते, दळणवळणाची साधणे, औद्योगिक, संस्था, व्यापार, उद्योग आदि क्षेत्रातही आपण या 73 वर्षाच्या कालखंडात नेत्रदिपक प्रगती केली. लोककल्याणकारी राज्य (वेलफेअर स्टेट) म्हणून भारत वेगाने पुढे आला आहे. देशाची प्रगती व विकास म्हणजेच सर्वसामान्य माणसाचा विकास आहे. जगाच्या व्यासपीठावर भारत आज अभिमानाने व ताठ मानेने वावरत आहे. याचे श्रेय आपल्या देशाच्या घटनेला निश्चितच आहे.

         देशाच्या प्रगतीत महाराष्ट्राचा वाटा सिंहाचा आहे. पुरोगामी व प्रगतराज्य म्हणून महाराष्ट्राचा नावलौकीक आहे. रोजगार हमी सारखी योजना महाराष्ट्राने देशाला दिली. या कालखंडात राज्याने सुध्दा आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधा, रस्ते, कृषी या क्षेत्रात लक्षणीय प्रगती केल्याचे त्यांनी सांगितले.

         इतरांच्या मतांचा सन्मान, ज्येष्ठांचा यथोचित आदर व महिलांचा सन्मान यासह आपली संस्कृती व सामाजिक एकता अखंड ठेवण्याला आपले सर्वोच्च प्राधान्य असायला हवे. आपला देश विविध परंपरेने नटलेला आहे. आपण आपल्या देशाला जगात किर्तीमान करण्यासाठी कटिबध्द होऊ या असे आवाहन त्यांनी या प्रसंगी जिल्हावासीयांना केले.

         प्रारंभी जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी ध्वजारोहण करुन परेडचे निरीक्षण केले. भारतीय रिझर्व बटालीयन पोलीस दल, महिला पोलीस पथक, गृहरक्षक दल, माजी सैनिक, आर.एस.पी. पथक, स्काऊट-गाईड पथक, पोलीस बॅन्ड पथक, पोलीस श्वान पथक, अग्नीशमन दल यांनी परेड संचलन केले. ध्वजारोहणानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते जिल्ह्यातील विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

         याप्रसंगी सांस्कृतिक कार्यक्रमात सडक अर्जुनीच्या विद्यार्थ्यांनी गोंडी नृत्य सादर केले. तर श्री गुरुनानक हिन्दी माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आर्मी बेस डान्स व देशभक्ती गीत, लिटल फ्लावर स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सर्जीकल ॲक्ट डान्स व पिरॅमीक डान्स तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले, त्याचप्रमाणे कुलदिपीका बोरकर यांनी प्रेरणा सभागृहात चित्रकला प्रदर्शनी लावून उपस्थितांची मने जिंकून घेतली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मंजुश्री देशपांडे यांनी केले.

error: Content is protected !!
Exit mobile version