शिरपूर (जैन) येथे 6 ते 10 फेब्रुवारी जिल्हास्तरीय कृषी महोत्सव – 2023

0
10

पिक प्रात्याक्षिके, धान्य महोत्सव, खाद्य पदार्थ दालने व चर्चासत्रांचे आयोजन

वाशिम,दि. 03  : जिल्हयातील शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानुन शेतीच्या दैनंदिन गरजा आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांची उकल होण्यासाठी कृषी विभाग आणि प्रकल्प संचालक (आत्मा) यांच्या संयुक्त वतीने जिल्हास्तरीय कृषी महोत्सव 2023 चे आयोजन 6 ते 10 फेब्रुवारी 2023 दरम्यान मालेगांव तालुक्यातील शिरपूर (जैन) येथील जानगीर महाराज संस्थान परिसरात करण्यात आले आहे. कृषी महोत्सवादरम्यान कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनामध्ये शासकीय संस्था तसेच कृषी क्षेत्रात आधुनिक उत्पादने तयार करणाऱ्या खाजगी कंपन्या प्रगत उत्पादनांचे आणि यंत्राचे सादरीकरण, शेतकरी उत्पादन कंपन्या, शेतकरी गट, महिला स्वयंसहायता बचतगट यांनी उत्पादीत केलेल्या वस्तू, पौष्टीक तृणधान्यांचे खाद्य पदार्थ विक्रीसाठी उपलब्ध राहणार आहे.

         प्रदर्शनामध्ये प्रत्यक्ष क्षेत्रावर पिक प्रात्याक्षीके, पिकांच्या उत्पादकता वाढीसाठी अष्टसुत्री तंत्रज्ञान, धान्य महोत्सव यामध्ये सेंद्रिय शेतमाल विक्री व प्रदर्शन, ट्रॅक्टर, ट्रॅक्टर चलित अवजारे व यंत्रे आदी कृषी अवजारांचे दालन, शेडनेट, पॉलीहाऊस, शेततळे व प्लास्टिक मल्चिंग, तुषार, ठिबक, सुक्ष्म सिंचन व अद्यावत उपकरणे, सोलार कंपाऊंड, सोलार पंप व सोलार हिटर आदी सौरऊर्जा उत्पादने, जैविक व रासायनिक खते, बियाणे व किटकनाशके या कृषी निविष्ठांचे दालन, महिला बचतगटांनी तयार केलेले पौष्टीक तृणधान्य भोजन, महिला बचतगटांमार्फत निर्मित विविध उत्पादनांची विक्री, कृषी व संलग्न विभागाचे, मत्सव्यवसाय, रेशिम उद्योग, कौशल्य विकास विभागाच्या दालनातून विविध योजनांची माहिती या महोत्सवाला भेट देणाऱ्या शेतकऱ्यांना व नागरीकांना मिळणार आहे.

         6 फेब्रुवारी रोजी दुपारी 2 वाजता बालयोगी गोपालनाथजी महाराज यांच्या हस्ते कृषी महोत्सवाचे उदघाटन करण्यात येणार आहे. 7 फेब्रुवारी रोजी आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य जिल्हास्तरीय कार्यशाळेचे उदघाटन सकाळी 10.30 वाजता जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार हे करतील. सकाळी 10.45 वाजता तंत्र अधिकारी दिलीप कंकाळ हे आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्याचे महत्व व आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष साजरा करण्याबाबत मार्गदर्शन करतील. सकाळी 11.45 वाजता डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिठाचे कनिष्ठ संशोधन सहायक आर.एम. आंबेनगरे हे ज्वारी, बाजरी व नाचणी या पौष्टीक तृणधान्य पिकाच्या लागवडीबाबत मार्गदर्शन करतील. दुपारी 12.15 वाजता कृषी विज्ञान केंद्र करडा येथील विषय विशेषज्ञ डॉ. तुषार देशमुख हे वरई, राळा व राजगीरा आदी पौष्टीक लघु तृणधान्य पिकाचे महत्व व लागवड या विषयावर मार्गदर्शन करणार आहे. दुपारी 2.30 वाजता जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आहार तज्ञ डॉ. श्रीमती लाहोरे हया पौष्टीक तृणधान्यांचे दैनंदिन आहारातील महत्व, दुपारी 3.30 वाजता कृषी विज्ञान केंद्र करडा येथील गृह विज्ञान विभागाच्या विषय विशेषज्ञ श्रीमती शुभांगी वाटाणे हया पौष्टीक तृणधान्यापासून तयार होणारे विविध पदार्थ व त्यांचे आहारातील महत्व या विषयावर मार्गदर्शन करतील.

         8 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता भारतीय स्टेट बँकेच्या ग्रामीण स्वरोजगार प्रशिक्षण संस्था, वाशिम या केंद्रामार्फत देण्यात येणाऱ्या विविध प्रशिक्षणाबाबत केंद्राचे संचालक रघुनाथ माने हे मार्गदर्शन करतील. दुपारी 12 वाजता जिल्हास्तरीय प्रशिक्षक गोपाळ मुठाळ हे प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रीया उद्योग, योजना व सामुहिक सुविधा केंद्र स्थापना या विषयावर, दुपारी 1 वाजता राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेचे जिल्हा व्यवस्थापक शंकर कोकडवार हे कृषी पायाभूत सुविधा निधी योजना या विषयावर, दुपारी 2.30 वाजता संत्रा पिक उत्पादन व विक्री या कार्यक्रमातंर्गत मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना वैयक्तिक शेततळे या विषयावर तंत्र अधिकारी (पाणलोट) सुहास भगत, दुपारी 3 वाजता विविध योजनेतील फळबाग लागवड या विषयावर तंत्र अधिकारी (फलोत्पादन) एस.टी. धनुडे, दुपारी 3.45 वाजता संत्रा पिक उत्पादन व विक्री व्यवस्थापन या विषयावर फलोत्पादन विषय विशेषज्ञ निवृत्ती पाटील हे मार्गदर्शन करतील.

           9 फेब्रुवारी रोजी सेंद्रिय शेती/ जैविक शेती या कार्यक्रमांतर्गत सकाळी 11 वाजता सहयाद्री शेतकरी उत्पादन कंपनीचा प्रवास व यशोगाथा यावर सहयाद्री फार्म नाशिकचे अध्यक्ष विलास शिंदे हे ऑनलाईन मार्गदर्शन करतील. सकाळी 11.45 वाजता भारतीय शेतीतील सेंद्रिय प्रमाणीकरणाचे महत्व या विषयावर रोमीफ इंडिया तसेच आंतरराष्ट्रीय सेंद्रिय शेती प्रमाणीकरण अधिकारी डॉ. प्रशात नाईकवडी हे मार्गदर्शन करतील. दुपारी 12.30 वाजता फळे व भाजीपाला उत्पादनामध्ये नैसर्गिक निविष्ठांचे महत्व या विषयावर नगर जिल्हयातील प्रगतशील शेतकरी राहुल रसाळ, दुपारी 1 वाजता शेतबांधावर अत्यल्प खर्चात नैसर्गिक निविष्ठा निर्मितीचे तंत्रज्ञान या विषयावर फार्म लॅब पुणेचे संचालक डॉ. संतोष चव्हाण, दुपारी 2.30 वाजता नैसर्गिक शेती या विषयावर श्री. श्री. इन्स्टीटयुट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी ट्रस्ट, बंगलोरचे जगन्नाथ कराळे, दुपारी 3 वाजता सोयाबीन अष्टसुत्री या विषयावर जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, दुपारी 4 वाजता सुरक्षित व निरोगी अन्नाचे मानवी शरीरासाठी महत्व या विषयावर आयुष मंत्रालय भारत सरकारच्या राष्ट्रीय निसर्गोपचार संस्थेच्या संचालक डॉ. श्रीमती सत्यलक्ष्मी हया ऑनलाईन मार्गदर्शन करतील. दुपारी 4.30 पद्मभुषण डॉ. विजय भटकर हे ऑनलाईन भारतीय शेतीमध्ये माहिती तंत्रज्ञान, जैव तंत्रज्ञान तसेच नॅनो टेक्नॉलॉजीचे महत्व या विषयावर मार्गदर्शन करतील.

           10 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता कृषी महोत्सवाचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये शेतकरी मनोगत व्यक्त करतील. पिक स्पर्धा 2021-22 मधील विजेत्या शेतकऱ्यांचा, केंद्र पुरस्कृत गळीत धान्य, सोयाबीन उत्पादकता वाढ व मुल्यसाखळी क्लस्टरमधून प्रथम क्रमांकाचे उत्पादन घेतलेले शेतकरी व कृषी सहायकांचा सत्कार करण्यात येणार आहे. तसेच राष्ट्रीय अन्न सुरक्षा, गळीतधान्य सोयाबीन पिक प्रात्यक्षीक क्लस्टरमधून प्रथम क्रमांकाचे उत्पादन घेतलेले शेतकरी व कृषी सहायकांचा सत्कार, उत्कृष्ट काम करणारे कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक व मंडळ कृषी अधिकारी, जिल्हयातील उत्कृष्ट संसाधन व्यक्तींचा आणि प्रदर्शनातील शासकीय, व्यापारी व बचतगटांच्या उत्कृष्ट स्टॉलधारकांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तरी 6 ते 10 फेब्रुवारीदरम्यान आयोजित जिल्हास्तरीय कृषी महोत्सवाला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी तसेच नागरीकांनी भेट देऊन या महोत्सवाचा लाभ घ्यावा. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी तथा आत्माचे प्रकल्प संचालक शंकर तोटावार यांनी केले आहे.