Home विदर्भ जि.प.क्रिडा संमेलनात कर्मचारी अधिकारी संघटना व अधिकार्यांच्या विरोधामुळे शिक्षकांना नो एंट्री

जि.प.क्रिडा संमेलनात कर्मचारी अधिकारी संघटना व अधिकार्यांच्या विरोधामुळे शिक्षकांना नो एंट्री

0

गोंदियाः गोंदिया जिल्हा परिषदेच्यावतीने अनेक वर्षाच्या कालावधीनंतर जिल्हापरिषद,पंचायत समिती अंतर्गत कार्यरत कर्मचारी वर्गासाठी क्रिडा व सांस्कृतीक समेंलनाचे आयोजन उद्या ९ व १० फेबुवारीला करण्यात आले आहे.मात्र जिल्हा परिषदेच्या एका वरिष्ठ अधिकारी व मुख्यालयातील काही कर्मचारी संघटनांनी शिक्षकांच्या सहभागाला केलेल्या विरोधामुळे हे संमेलंन मोजक्या कर्मचारी वर्गाची हौस भागवण्यासाठी करण्यात येत असल्याचे आत्ता स्पष्ट झाले आहे.

प्राथमिक शिक्षक हे जिल्हा परिषदेचे कर्मचाारी असतांना त्यांना स्पर्धेत प्रत्यक्ष सहभागी न होऊ देता त्यांना क्रीडांगण तयार करण्यासाठी व चमू तयार करण्यासाठी जिल्हा परिषद मुख्यालयातील एका कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षाने अधिकार्यांंना बोलून नावे मागवून त्यांच्याकडून हमाली करवून घ्यायला विसरले नाही.त्यातच या शिक्षकांच्या सहभागाला एका वरिष्ठ अधिकार्यांने केलेला विरोध हा जिल्हा परिषदेच्या पदाधिकार्यांना भविष्यात अडचणीचे ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीसह शिक्षक संघानेही शिक्षकांना डावलण्याच्या भूमिकेचा निषेध नोंदवला आहे.कंत्राटी कर्मचारी जर सहभागी होऊ शकतात तर आम्ही जिल्हा परिषदेचे कर्मचारी नाहीत का अशा प्रश्नही त्यांनी उपस्थित करुन जिल्हा परिषद अध्यक्षांकडून आमचाही सहभाग होऊ शकेल अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे.आता जिल्हा परिषदेचे अध्यक्षांचे एैकले जाते की त्या वरिष्ठ अधिकारी व मुख्यालयात तळ ठोकून बसून कर्मचारी संघटनेचे नेते बसलेल्यांची एैकले जाते याकडे लक्ष लागले आहे.

या क्रिडा समेंलनासाठी आधी सामान्य प्रशासन विभागाकडून पत्र जारी करण्यात आले होते.त्यानंतर  सर्व विभागप्रमुखाकडून प्रत्येकी 10 हजार रुपये वसुली करण्याचे तोंडी निर्देश देण्यात आल्याचेही वृत्त आहे.त्यामुळे विभागप्रमुख हे 10 हजार कुठून देतात याकडेही लक्ष लागलेले आहे.विशेष म्हणजे जिल्हा निधीत जमा असलेला कर्मचारी कल्याण निधी व संकलित निधी या कार्यक्रमासाठी खर्च होणार असून त्याचे आँडिट होण्याची शक्यता नसल्याचेही बोलले जात आहे.

प्राथमिक शिक्षकांना वगळणे योग्य नाही-किशोर डोंगरवार

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांची संख्या अधिक असल्याचे कारण पुढे करुन जिल्हा परिषदेच्यावतीने आयोजित क्रिडा व साँस्कृतिक कार्यक्रमात शिक्षकांना वगळणे योग्य नाही.जेव्हा की आम्ही जिल्हा परिषदेचेच कर्मचारी आहोत.या मुद्याला घेऊन आम्ही जिल्हा परिषद अध्यक्ष पकंज रहागंडाले यांचीही भेट घेत त्यांच्याशी चर्चा केल्याचे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे अध्यक्ष किशोर डोंगरवार यांनी सांगितले.शिक्षकांना या स्पर्धेत डावलणे म्हणजे एकप्रकारे आम्हाला जिल्हा परिषदेचे कर्मचारी मानण्यास नकार देण्यासारखेच झाले की काय अशी खंतही व्यक्त केली.

शिक्षकांवर अन्याय केला- शंकर चव्हाण

जिल्हा परिषदेच्यावतीने उद्या गुरुवार(दि.09)पासून जिल्हास्तरीय क्रीडा व साँस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.यामध्ये आम्ही जिल्हा परिषदेचे कर्मचारी असतानाही आम्हाला सामावून न घेता जिल्हा प्रशासनाने आमच्या शिक्षक वर्गावर अन्याय केलेला आहे.जेव्हा की मुख्यालयातील कंत्राटी कर्मचारी वर्गाला सामावून घेण्यात आले.कर्मचारी कल्याण निधीकरीता आमचाही पैसा जिल्हा निधीत जमा झालेला असताना आम्हाला डावलणे योग्य नाही,जेव्हा त्या निधीचा सदुपयोग करण्यासाठी सर्वांना सामावून घ्यायला हवे होते असे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हा अध्यक्ष शंकर चव्हाण यांनी म्हटले आहे.

सर्व कर्मचार्यांना सामावून घ्यायला हवे-कमलेश बिसेन

गोंदिया जिल्हा परिषदेच्यावतीने जिल्हास्तरीय क्रिडा व साँस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.या स्पर्धेमध्ये जिल्हा परिषद अंतर्गत सर्व आस्थापनेतील कर्मचारी वर्गाला सामावून घ्यायला हवे अशी भूमिका आपणही मांडली होती,मात्र त्याकडे लक्ष दिले गेले नाही असे ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष कमलेश बिसेन यांनी सांगितले.

Exit mobile version