टाकळी डोल्हारी प्रकल्पबाधितांच्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा – उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

0
16

मुंबई, दि. 15 : टाकळी डोल्हारी मध्यम प्रकल्पबाधित ग्रामस्थांची मागणी लक्षात घेऊन शासनाने नियमानुसार टाकळी डोल्हारी प्रकल्पबाधित ग्रामस्थांचा प्रश्न लवकर सोडविण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करावेत, असे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी दिले.

विधानभवन येथे यवतमाळ जिल्ह्यातील ता.नेर येथील टाकळी मध्यम डोल्हारी प्रकल्पाच्या पुनर्वसनासंदर्भात आयोजित बैठकीत उपसभापती डॉ. गोऱ्हे बोलत होत्या. यावेळी विधान परिषद सदस्य अभिजित वंजारी, मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असिमकुमार गुप्ता, यवतमाळचे जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ, उदापूर सरपंच ममता कुमरे, ग्रामस्थ अजय भोयर, नीलेश चौधरी, दिलीप तिजारे यावेळी उपस्थित होते.

उपसभापती डॉ.गोऱ्हे म्हणाल्या की, टाकळी डोल्हारी मध्यम प्रकल्पबाधित ग्रामस्थांनी शासनाने पुनर्वसनासाठी दिलेली जागा नाकारली आहे. ग्रामस्थांना या जागेऐवजी त्यांच्या निवडीच्या जागेवर पुनर्वसन व्हावे असा आग्रह आहे. ग्रामस्थांनी पुनर्वसनासाठी कोणत्या तरी एका जागेचा आग्रह न धरता पुनर्वसनासाठी नव्याने पाच ठिकाणे शासनाला कळवावित. प्रशासनानेही या कामामध्ये दिरंगाई न करता सहानुभूतीपूर्वक विचार करुन आठ दिवसात या विषयाच्या अनुषंगाने निर्णय घ्यावा. टाकळी डोल्हारी मध्यम प्रकल्पाचे काम थांबणार नाही याची देखील खबरदारी घेण्यात यावी. जलसंपदा मंत्री यांच्या सूचनांप्रमाणे यावर तातडीने तोडगा काढावा. ग्रामस्थांच्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा, असे निर्देश यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी दिले.