Home विदर्भ साहित्य समाजाचा आरसा आहे – ॲड. लखनसिंह कटरे

साहित्य समाजाचा आरसा आहे – ॲड. लखनसिंह कटरे

0

गोंदिया, दि.1 : कलावंत प्रत्येकात असतो, परंतू कलानिर्मितीसाठी कलावंतामध्ये साधना व संवेदना असणे आवश्यक असते. समाजात बदल घडवून आणण्याची मोलाची कामगिरी साहित्यातून पार पडते. संत तुकाराम, संत नामदेव, मुक्ताबाई, तुकडोजी महाराज, बहिणाबाईची गाणे आजही अनेकांना मुखोदगत असून मनाला रुचेल तेच साहित्य आत्मसात केले जाते. म्हणूनच साहित्य समाजाचा आरसा आहे. असे प्रतिपादन अखिल भारतीय साहित्य परिषदेच्या विदर्भ प्रांतचे अध्यक्ष ॲड. लखनसिंह कटरे यांनी केले.

        उच्च व तंत्रशिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय गोंदिया यांचे संयुक्त विद्यमाने श्री गुरुनानक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, गोंदिया येथील सभागृहात गोंदिया ग्रंथोत्सव-2022 आयोजित परिसंवादामध्ये अध्यक्ष स्थानावरुन ते बोलत होते.

        शांबाबाई शेळके, अण्णाभाऊ साठे, वसंत बापट, जी.ए. कुलकर्णी, कवी शंकर रमाणी यांचे मराठी साहित्य क्षेत्रातील योगदान या विषयावर आयोजित परिसंवादामध्ये जगत महाविद्यालय गोरेगाव प्रा.डॉ. सी.एस. राणे, कवी व साहित्यिक माणिक गेडाम, आदिलोक विद्यालय बोळुंदा मुख्याध्यापक के.एस. वैद्य सहभागी झाले होते.

        साहित्य मानवी मुल्याची जपवणूक करतो. साहित्य माणसाला नवविचारांची दृष्टी देत असते. लेखकाचे अनुभव मनुष्याला जीवन जगण्याची प्रेरणा तर समाजाला दिशा देत असते. साहित्याच्या माध्यमातून इतिहास, वर्तमान तसेच भविष्याचे दर्शन होते. समाजात बदल घडवून आणण्याची मोलाची कामगिरी साहित्यातून पार पडते. पुस्तकांशी मैत्री करा असे त्यांनी यावेळी सांगितले.

       मराठी साहित्य क्षेत्रात योगदान देणारे पाचही साहित्यिकांचे यावर्षी जन्म शताब्दी वर्ष आहे. ग्रंथोत्सव म्हणजे ग्रंथांचा उत्सव असे ते म्हणाले. महाराष्ट्रात एक साप्ताहिक आहे ते म्हणजे ‘साधना साप्ताहिक’ वसंत बापट या साप्ताहिकाचे संपादक होते. हे साप्ताहिक वाचले तर दुसरे काही वाचायची आवश्यकता नाही. वास्तविक पाहता अण्णाभाऊ साठे इतका मोठा साहित्यिक कदाचित आपल्याला दुसऱ्यांदा भेटणार नाही. स्वतंत्र निर्मिती लेखन हे आपल्याला अण्णाभाऊ साठे यांच्या लेखनातून मिळते. डॉ. विद्याधर बन्सोड यांनी मुक्काम पोष्ट तेढा ही कादंबरी लिहिली आहे. कवी, साहित्यिक, लेखक यांची ओळख व्हावी हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. झाडीबोलीतील खरी कादंबरी कुठली असेल तर ती आहे मुक्काम पोष्ट तेढा. ज्यांचा मराठी साहित्यिक म्हणून उल्लेख आहे. पुस्तके खरेदी करा व त्याचे वाचन करा. परिसंवादातील विषयाच्या अनुषंगाने ज्या पाच साहित्यिकांचा उल्लेख केलेला आहे त्या पाचही साहित्यिकांची पुस्तकं वाचावी असे त्यांनी यावेळी सांगितले.

          जगत महाविद्यालय गोरेगाव प्रा.डॉ. सी.एस. राणे, कवी व साहित्यिक माणिक गेडाम, आदिलोक विद्यालय बोळुंदा मुख्याध्यापक के.एस. वैद्य यांनी शांबाबाई शेळके, अण्णाभाऊ साठे, वसंत बापट, जी.ए. कुलकर्णी व शंकर रमाणी यांनी साहित्य प्रकाशनावर प्रकाश टाकला. उपरोक्त साहित्यिकांचे लेखन हे अनुभवसिध्द असून आजही समाजाला दिशा देणारे आहे. त्यांनी मराठी भाषेत विपुल लेखन केले असून त्यांच्या लिखाणामुळे मराठी भाषा समृध्द होण्यास मदत झाली आहे.

         परिसंवादाच्या दुसऱ्या भागात ‘स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन’ या विषयावर आयोजित परिसंवादामध्ये जिल्हा सांख्यिकी कार्यालयाचे उपसंचालक रुपेशकुमार राऊत, जिल्हा नियोजन अधिकारी (मानव विकास) श्रीराम पाचखेडे, रामकृष्ण कनिष्ठ महाविद्यालय कुऱ्हाडी प्रा. किशोर पटले, विदर्भ स्टडी सर्कलचे संचालक त्रिलोक शेंडे सहभागी झाले होते.

        आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे. स्पर्धेत टिकण्यासाठी स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम करणे गरजेचे आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी नेमकी कधी करावी हा एक मोठा प्रश्न आहे. आपले भविष्य घडविण्यासाठी नियोजन करणे अत्यंत गरजेचे आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी आपले नियोजन असायला पाहिजे की, नेमके आपण काय केले पाहिजे. आपल्याला संधी आहे. आपण ती संधी शोधायला पाहिजे व संधीचा लाभ घेतला पाहिजे. हे युग माहिती तंत्रज्ञानाचे युग आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास असणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी नियोजनबध्द पुस्तकांचे अवांतर वाचन केले पाहिजे. उच्चशिक्षीत विद्यार्थी सुध्दा पोलीस शिपाई भरतीला येतात, याचे उदाहरण देऊन त्याचे स्पष्टीकरण सुध्दा रुपेशकुमार राऊत यांनी यावेळी सांगितले.

          जिल्हा नियोजन अधिकारी (मानव विकास) श्रीराम पाचखेडे, रामकृष्ण कनिष्ठ महाविद्यालय कुऱ्हाडी प्रा. किशोर पटले व विदर्भ स्टडी सर्कलचे संचालक त्रिलोक शेंडे यांनी सुध्दा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन विषयावर सविस्तर माहिती विशद केली. विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेची पुर्वतयारी करण्यासाठी कालबध्द नियोजनाच्या माध्यमातून अथक परिश्रम करुन आपले ध्येय निश्चित करुन यशस्वी व्हावे व देशाच्या प्रगतीसाठी आपले योगदान दयावे असे त्यांनी सांगितले.

        कार्यक्रमास उपस्थितांचे आभार जिल्हा ग्रंथालय अधिकारी अस्मिता मंडपे यांनी मानले. कार्यक्रमाला ग्रंथप्रेमी, वाचक वर्ग, नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

                                                                                                         00000

Exit mobile version