Home विदर्भ अनुसूचित जाती उपयोजनांच्या कार्यशाळेचे यशस्वी आयोजन

अनुसूचित जाती उपयोजनांच्या कार्यशाळेचे यशस्वी आयोजन

0
  • सामाजिक न्याय विभागाचा अभिनव उपक्रम

    गोंदिया, दि.10 : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सहायक आयुक्त, समाज कल्याण, गोंदिया कार्यालयामार्फत महिलांकरीता नाविण्यपुर्ण उपक्रम राबविण्यात आला. सामाजिक न्याय विभागामार्फत तसेच अनुसूचित जाती उपयोजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची सर्व तळागाळातील महिलांना माहिती व्हावी यासाठी दिनांक 9 मार्च 2023 रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, गोंदिया येथे महिलांकरीता एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

        कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अनुसूचित जाती व नवबौध्द मुलींची शासकीय निवासी शाळा डव्वा येथील मुख्याध्यापिका संध्या दहीवले होत्या. तर समाजकार्य महाविद्यालय गोंदियाच्या प्राचार्य मंगला कटरे, प्रभारी गृहपाल नादीरा नंदेश्वर, सुलोचना तुरकर, बाह्यस्त्रोत कर्मचारी, सुजाता मठ्ठे मंचावर उपस्थित होत्या.

        कार्यक्रमाला उपायुक्त तथा जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य राजेश पांडे, जिल्हा माहिती अधिकारी रवि गिते, समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त विनोद मोहतुरे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

       महिलांचे संरक्षण आणि सक्षमीकरणासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरु आहेत. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याची आवश्कता असल्यामुळे शासनस्तरावर यासाठी विविध योजना व उपक्रम राबविण्यात येत आहेत. जीवनात स्त्रीचे महत्व अनन्यसाधारण आहे. स्वत:ची आई म्हणजे आईच असते. आईचे ऋण कधीही फेडता येणार नाही. स्त्री ही कितीही कठीण परिस्थिती आली तरी आपल्या कुटूंबाच्या पाठीशी कणखरपणे उभी राहते, अशी स्त्री शक्तीची महती आहे. त्यामुळे समाजात वावरतांना प्रत्येक व्यक्तीने महिलांचा मान-सन्मान केला पाहिजे. असे प्रास्ताविकातून विनोद मोहतुरे यांनी सांगितले.

        महिला आता कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत. प्रत्येक क्षेत्रात महिलांची प्रगती होत आहे. महिलांच्या सामर्थ्याची जाणिव पुरुष मंडळींना होणे अपेक्षीत आहे. महिलांचा सन्मान करणे हे पुरुषांची नैतिक जबाबदारी आहे. महिलांना खुप बंधने असतात, त्यांना मोकळेपणाने जगू दया, असे राजेश पांडे यांनी सांगितले.

       ‘जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उध्दारी’ असे म्हटल्या जाते ते बरोबर आहे. कारण स्त्री शिकली तर संपूर्ण घरच शिक्षीत होते. प्रत्येक क्षेत्रात महिला आता उंच भरारी घेत आहेत. महिलांना सन्मान देऊन त्यांचे हात बळकट करण्याची गरज असून आज महिला चुल व मुल पुरते सीमीत नाही. देशात प्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी महिला शिक्षणाचा पाया रचला, म्हणून आज प्रत्येक क्षेत्रात महिलांची प्रगती होताना दिसत आहे, असे रवि गिते यांनी सांगितले.

       प्रारंभी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

        जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सदर कार्यशाळेत उपस्थित सर्व महिलांनी विविध उपक्रम राबविले. त्यामध्ये संगीत खुर्ची, गाण्यांची अंताक्षरी, फुगे फुगविणे व विविध प्रकारचे मनोरंजनात्मक खेळांचे आयोजन करुन दैनंदिन कामकाजातून तणावमुक्त होऊन आनंदी वातावरणात असा आगळावेगळा दिवस साजरा करण्यात आला.

        सदर कार्यशाळेमध्ये सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय गोंदिया, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, शासकीय वसतिगृह, निवासी शाळा व समाजकार्य महाविद्यालयातील महिला अधिकारी, कर्मचारी व बाह्यस्त्रोत कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.

       कार्यक्रमाचे सुत्रसंचालन समाज कल्याण निरीक्षक श्रीमती स्वाती कापसे यांनी केले तर उपस्थितांचे आभार समाज कल्याण निरीक्षक श्रीमती विद्या मोहोड यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संगणक ऑपरेटर लक्ष्मण खेडकर, कनिष्ठ लिपीक अमेय नाईक, निविदिता बघेले, हेमंत घाटघुमार, सहायक ग्रंथपाल कविता पडोळे, शैलेश उजवणे व प्रकाश मेश्राम यांनी परिश्रम घेतले.

error: Content is protected !!
Exit mobile version