‘नागपूर: टायगर कॅपिटल ऑफ इंडिया’चे जी-२० पाहुण्यांनाही वेड

0
19

पुराण काळापासून भारत हा वाघांचा आणि नागांचा देश म्हणून ओळखला जातो. त्यातही केवळ भारतात आढळणारा पट्टेदार वाघ भारतीय संस्कृती आणि पौराणिक कथांचा महत्त्वपूर्ण भाग राहीले आहेत. मात्र मधल्या काळात वाघांची संख्या कमी झाली होती अशावेळी शासनाने व्याघ्र संवर्धनाकडे लक्ष वेधले. आणि देशाच्या नकाशावर ठसठशीतपणे विदर्भ महाराष्ट्राने वाघाची भूमी म्हणून आपले नाव कोरले. हे शक्य झाले आहे विदर्भातील अभयारण्याच्या वाढत्या संख्येने त्यामुळेच नागपूरला ‘टायगर कॅपिटल ऑफ इंडिया’ म्हटले जाते. जी-20 साठी येणाऱ्या विदेशी पाहुण्यांना देखील या नागपूरच्या कीर्तीचे अप्रूप आहे. त्यामुळे नागपूरला येणाऱ्या विदेशी पाहुण्यांची एक स्वारी आपल्या जिल्ह्यातील पेंच प्रकल्पाला भेट देणार आहे. त्यासाठी प्रशासनाची भक्कम तयारीही सुरू आहे. मात्र आज जाणून घेणार आहोत आपण आपल्या नागपूर सभोवती असणाऱ्या अभयारण्याची माहिती.

आदि काळापासून शक्तीचे प्रतिक असलेल्या वाघांच्या वाढत्या संख्येने नागपूरच्या आजूबाजूचे जंगल बहरले आहेत. राज्यातील सहापैकी बोर, पेंच, ताडोबा, मेळघाट व नागझिरा हे पाच व्याघ्र प्रकल्प तसेच मध्यप्रदेशातील कान्हा, पेंच, व सातपुडा हे तीन व्याघ्र प्रकल्प नागपूरच्या सभोवताल 250 कि.मी. च्या अंतरावर आहेत. त्यामुळे तब्बल आठ व्याघ्र प्रकल्पांचे प्रवेशद्वार असलेल्या नागपूरने देशाची ‘टायगर कॅपिटल’ म्हणून ओळख निर्माण केली आहे.

कधीकाळी शिकार व अधिवासावरील अतिक्रमणामुळे आपल्या अस्त्विासाठी झगडाव्या लागणाऱ्या वाघांना शासनाने संरक्षण घोषित केल्यामुळे वाघांच्या संख्येत परिणामकारक वाढ दिसून येत आहे. 2006 मध्ये महाराष्ट्रात सुमारे 103 वाघ होते. तर 2018 मध्ये ही संख्या 312 च्या जवळपास पोहचली. केवळ नागपूरच्या सभोवतालचा विचार केल्यास यातील 166 म्हणजे तब्बल निम्म्यापेक्षाही जास्त वाघ हे फक्त चंद्रपूर जिल्ह्याच्या विविध वनपरिसरात होते. याशिवाय मेळघाट-46 वाघ, पेंच-46, नवेगाव-नागझिरा-6, बोर-6 या व्याघ्र प्रकल्पांव्यतिरिक्त पवनी-उमरेड-कऱ्हांडला -11 व टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य-7  येथेही मोठ्या प्रमाणात वाघांचा वावर आहे. दर चार वर्षांनी होणाऱ्या व्याघ्र गणणेअंतर्गत 2022 च्या वाघ्र गणणेची आकडेवारी अद्याप जाहिर झालेली नसली तरी व्याघ्र संवर्धनात शासन व वन्यप्रेमींनी दाखवलेल्या सक्रीय सहभागामुळे ही संख्या निश्चितच मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. स्थानिक वन्यप्रेमींच्या अंदाजानुसार सध्या मेळघाटमध्ये सुमारे 52 वाघ, 22 छावे व 147 बिबट तर ताडोबा मध्ये 87 वाघ तसेच पेंच मध्ये 55 वाघ असल्याचे सांगितले जाते. नागपूरजवळील वनांचा हा परिसर वाढत्या वाघांच्या संख्येने समृद्ध झाला आहे. चला तर जाणून घेवू या नागपूरजवळील या व्याघ्र प्रकल्पांबाबत.बोर व्याघ्र प्रकल्प : पूर्वी शिकारीसाठी राखीव असलेले हे क्षेत्र जैवविविधता वाचविण्याच्यादृष्टीने 1970 मध्ये अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले. ऑगस्ट 2014 मध्ये याला व्याघ्र प्रकल्पाच्या दर्जा प्राप्त झाला. नागपूर पासून दक्षिणेकडे 80 कि.मी. अंतरावर वर्धा जिल्ह्यात असलेल्या या प्रकल्पाचा आधीचा विस्तार 61.10 चौ.कि.मी. होता. त्यात बोर, नवीन बोर आणि विस्तारित बोर अशा तीन संरक्षित क्षेत्रांचा समावेश झाल्यामुळे हा प्रकल्प आता एकूण 138.12 चौ.कि.मी. विस्तारला असून 678.15 चौ.कि.मी. बफर क्षेत्रासह याचे एकूण क्षेत्र 816.27 चौ.कि.मी. आहे. या प्रकल्पात वाघासह, बिबट, रानकुत्री, अस्वल, नीलगाय, रानडुक्कर, चितळ यांची संख्या मुबलक आहे.

मेळघाट व्याघ्र प्रकल्प : कोरकू आदिवासींच्या रंगीबेरंगी संस्कृतीने नटलेला मेळघाट प्रदेशाला 1974 मध्ये व्याघ्र प्रकल्प म्हणून मान्यता देण्यात आली. नागपूरपासून 250 कि.मी. अंतरावर असलेला हा प्रकल्प भारतातील पहिल्या नऊ व्याघ्र प्रकल्पापैकी एक आहे. एकूण 2027.39 चौ.मी. परिसरात पसरलेल्या मेळघाट व्याघ्र प्रकल्पात गुगामल राष्ट्रीय उद्यान (361.28 चौ.कि.मी.), मेळघाट वन्यजीव अभयारण्य (788.75 चौ.कि.मी.), एकाधिकार वापर क्षेत्र (526.90 चौ.कि.मी.), नरनाळा वन्यजीव अभयारण्य (12.35 चौ.कि.मी.) वान वन्यजीव अभयारण्य (211 चौ.कि.मी.) अंबाबरवा वन्यजीव अभयारण्य (127 चौ.कि.मी.) या संरक्षित क्षेत्राचा परिसर येतो. हा प्रकल्प अमरावती, अकोला आणि बुलढाणा या तीन जिल्ह्यात पसरला आहे. जैवविविधतेने नटलेला मेळघाट व्याघ्र प्रकल्पात वाघ, बिबट, रानमांजर,  रानकुत्रा, तरस, अस्वल, चांदी-अस्वल, उडणारी खार, रानडुक्कर, ससा,  साळींदर, पानमांजर, निलगाय, वानर,  चितळ, सांभर, चौशिंगा यासह 80 प्रकारच्या सस्तन प्राण्यांची व 263 प्रजातीच्या पक्षांची नोंद आहे. येथे चिखलदरा सेमाडोह, हरीसाल,  शहानुर-नरनाळा किल्ला ही पर्यटन स्थळे आहे

नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प : गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात पसरलेल्या व नागपूर पासून 120 कि.मी. अंतरावर असलेल्या या प्रकल्पाला 12 डिसेंबर 2013 रोजी व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा मिळाला.  या प्रकल्पात नवेगाव राष्ट्रीय उद्यान (133.88 चौ.कि.मी.), नवेगाव वन्यजीव अभयारण्य (122.756 चौ.कि.मी.), नागझिरा वन्यजीव अभयारण्य (152.810 चौ.कि.मी.) नवीन नागझिरा वन्यजीव अभयारण्य (151.335 चौ.कि.मी.) आणि कोका वन्यजीव अभयारण्य (100.138 चौ.कि.मी.) यांचा समावेश आहे. नवेगाव प्रकल्पात 34 प्रजातीच्या स्वस्तन प्राण्यांची व 200 पक्षी प्रजातीची नोंद आहे. हिवाळ्यात लडाख आणि तिबेटहून स्थलांतर करून येणारे राजहंस पक्षी येथे आढळून आले आहेत.

पेंच व्याघ्र प्रकल्प : नागपूरपासून 70 किलोमीटर अंतरावर असलेल्या या प्रकल्पाला 1975 मध्ये राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा मिळाला तर 1999 मध्ये व्याघ्र प्रकल्प म्हणून मान्यता मिळाली.  257 चौ.कि.मी. च्या पेंच क्षेत्रात 182 चौ.कि.मी. चे मानसिंग देव हे वन्यजीव अभयारण्य 2010 मध्ये संलग्न झाले. त्यामुळे बफर झोन सह याचा एकूण विस्तार 1180 चौ.कि.मी. झाला. वाघ व इतर विविध प्राण्यांसोबत येथे 164 प्रजातीच्या पक्षांची नोंद असून मेघदूत जलाशय व आंबाखोरी धबधबा ही स्थळे प्रसिद्ध आहे.

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प : वनपर्यंटनासाठी जागतिक नकाशावर स्थान मिळालेले ताडोबा नागपूर पासून 155 कि.मी. अंतरावर आहे. 1955 मध्ये स्थापन झालेले सर्वात जुने ताडोबा राष्ट्रीय उद्यान (116.55 चौ.कि.मी.) आणि अंधारी वन्यजीव अभयारण्य (509.27 चौ.कि.मी.) असा एकत्रितपणे घोषित झालेला ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचा विस्तार 625.40 चौ.कि.मी. आहे. तर 1102.77 चौ.कि.मी.  बफर क्षेत्रासह याचा एकूण विस्तार 1727.59 चौ.कि.मी. आहे.  2018 मध्ये येथे सुमारे 88 वाघांची नोंद होती. पट्टेरी वाघ हे ताडोबाचे प्रमुख आकर्षण. गेल्या काही वर्षात येथे दुर्मिळ काळ्या बिबट्याचेही दर्शन होत आहे. जंगली प्राण्यांसोबतच ताडोबात 280 प्रकारच्या पक्षी प्रजातीची व 74 प्रजातींच्या फुलपाखरांची नोंद आहे

समृद्ध वनपरिसराने वेढलेले नागपूर हे देश-विदेशातील हौशी वनपर्यटकांसाठी मध्यवर्ती ठिकाण आहे. येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ, पुर्व-पश्चिम तसेच उत्तर-दक्षिण रेल्वे व गतीमान रस्ते तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाची हॉटेल व्यवस्था आहे. नागपूरजवळील व्याघ्र प्रकल्प, राष्ट्रीय उद्याने व वन्यजीव अभयारण्ये हे संपुर्ण जगात ‘टायगर कॅपिटल ऑफ इंडिया’ म्हणून नागपूरची ओळख निर्माण करतात. जी -२० परिषदेत सी -२० गटाची बैठक नागपूर शहरात होत आहे. यामुळे आता नागपूरच्या ‘टायगर कॅपिटल ‘ची ओळख जगभर वृद्धींगत होणार आहे.

 

– गजानन जाधव, माहिती अधिकारी, नागपूर