गोंदियाच्या गटरयोजनेच्या नालीत फसलेल्या कामगाराचा मृत्यू ,जनतेत आक्रोश

0
51

गोंदिया,दि.13ः- गोंदिया शहरात नगरपरिषदेच्यावतीने सुरु करण्यात आलेल्या भूमिगत गटार योजनेच्या कामाच्या गुणवत्तेवर गेल्या अनेक महिन्यापासून नागरिकांत रोष असतानाही प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले.या प्रशासनाच्या हलगर्जीपणामुले आज मामा चौक परिसरात भूमिगत गटार योजनेच्या 12 फूट नालीमध्ये या कामावरील एक मजूर फसल्याने त्याचा त्याठिकाणीच मृत्यू झाल्याची घटना आज 13 मार्च रोजी घडली.सदर कामगाराचे नाव सुरेश जगन नेवारे गोविंदपूर निवासी असल्याचे वृत्त आहे.जोपर्यंत जिल्हास्तरावरील प्रशासकीय अधिकारी मृतकाच्या घरी येऊन मोबदल्याची घोषणा करणार नाही,व दोषीवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार नाही,तोपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार न करण्याची भूमिका नागरिकांनी घेतली आहे.

नगरपरिषदेच्या अग्निशमन विभागाच्या जवानानी त्या कामगाराला बाहेर काढण्याकरीता कसोशिने प्रयत्न केले. सामाजिक कार्यकर्ते इरफान सिध्दीकीसह गोंदियातील अनेक नागरिकांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यासह सर्वांनाच येथील बांधकामाची तक्रार केली.मात्र नगरपरिषदेचे प्रशासक,महारष्ट्र जिवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता यांनी कानाडोळा करीत कंत्राटदाराचा बचाव करण्याचीच भूमिका घेतल्यामुळेच ही घटना घडल्याचे नागरिकांचे म्हणने आहे.