Home विदर्भ कलपाथरी कालव्याच्या पाळीवर शेतकर्‍यांचे उपोषण

कलपाथरी कालव्याच्या पाळीवर शेतकर्‍यांचे उपोषण

0

गोरेगाव-कलपाथरी मध्यम प्रकल्पाच्या कालव्याच्या पाळीवर दोन शेतकर्‍यांनी त्यांच्या मागण्यांना घेऊन ९ मार्चपासून उपोषणाला सुरुवात केली आहे. मात्र, सात दिवसाचा कालावधी लोटूनही प्रशासनाने शेतकर्‍यांच्या उपोषणाची दखल घेतलेली नाही. गोरेगाव पंचायत समितीचे सभापती मनोज बोपचे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन उपोषणकर्त्यांच्या मागण्या, समस्या जाणून घेत प्रशासनाची चर्चा करणार असल्याची ग्वाही दिली.
कलपाथरी मध्यम प्रकल्पाच्या कालव्याचे बबई ते देऊटोला दरम्यानचे गेट चोरी झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, या संदर्भात संबंधित विभागाने पोलिसात तक्रार दाखल केली नाही. दुसरीकडे संबधित विभागातील कर्मचारी गेट कार्यालयात असल्याचे सांगतात. या संदर्भात गेट कार्यालयात कुठे आहे ते परस्पर दाखवावे, अशी मागणी उपोषण करणार्‍या शेतकर्‍यांनी केली आहे. बबईचे शेतकरी यांनी आपल्या शेतात कालव्याशेजारी विहीर खोदकाम करून आडवी बोर मारून कालव्याच्या पाण्याची अवैधरित्या पाणीसाठा करीत असल्याप्रकरणी झनकलाल सहसराम बिसेन यांनी तक्रार दाखल केली होती. मात्र, त्या दिशेने कोणतीही कारवाई झाली नाही. तक्रारीची कोणत्याही प्रकारची चौकशी न झाल्यामुळे प्रशासनाच्या विरोधात भीमलाल सहसराम बिसेन, झनकलाल सहसराम बिसेन रा. बबई हे शेतकरी बेमुदत उपोषणाला बसले आहेत. बुधवार, १५ मार्च रोजी गोरेगाव पंचायत समितीचे सभापती मनोज बोपचे यांनी उपोषणस्थळी भेट दिली. शेतकर्‍यांच्या मागण्या व समस्या जाणून घेत लवकरच तोडगा काढण्याचे आश्‍वासन दिले.

Exit mobile version