Home विदर्भ योग्य खबरदारीमुळे इन्फ्लूएंझा विषाणूपासून बचाव होईल – जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे

योग्य खबरदारीमुळे इन्फ्लूएंझा विषाणूपासून बचाव होईल – जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे

0

गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करा

लक्षणे आढळल्यास डॉक्टरचा सल्ला घ्या

      गोंदिया, दि.18 : इन्फ्लूएंझा हा विषाणूमुळे होणारा आजार आहे. तातडीने उपचार सुरु केल्यास हा आजार लवकर बरा होण्यास मदत होते. त्यामुळे लक्षणे आढळल्यास वेळीच उपचार सुरु करावे. राज्यात काही जिल्ह्यात इन्फ्लूएंझा एच3 एन2 विषाणु सदृश्य लक्षणे असलेल्या इन्फ्लूएंझा रुग्णांमध्ये वाढ होत आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात सर्दी, ताप, खोकल्याचा संसर्ग मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. म्हणून नागरिकांनी सावधता बाळगणे गरजेचे आहे. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे व आवश्यक कामानिमीत्त बाहेर जाणे आवश्यकच असेल तर आरोग्य सुरक्षेच्या दृष्टीने गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचे आवाहन जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी केले आहे.

       सामान्य व्हायरल इन्फेक्शन तीन-चार दिवसात बरा होतो. सद्यस्थितीत व्हायरल इन्फेक्शनमुळे मोठ्या प्रमाणात रुग्ण दवाखान्यामध्ये भरती होत आहेत. आजारपणाचा आणि इन्फेक्शन नंतर अशक्तपणा जाणवण्याचा कालावधी वाढल्याची नोंद रुग्णालयांमध्ये होत आहे. हे इन्फेक्शन प्रामुख्याने एच3 एन2 या विषाणूमुळे होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

     इन्फ्लूएंझा एच3 एन2 विषाणु आजार कसा पसरतो :- हा संसर्गजन्य आजार असल्याने एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला होऊ शकतो, जो गंभीर असू शकतो. खुप उशीर होण्यापुर्वी काळजी घ्यावी. व्यक्ती ते व्यक्ती, खोकणे आणि शिंकणे यातुन श्वासाद्वारे, हात आणि पृष्ठभागावर पडलेले थेंब.

       इन्फ्लूएंझा एच3 एन2 फ्लू सदृश्य रुग्णाची लक्षणे :- श्वसन संस्थेचा नुकताच आजार झालेल्या व्यक्तीमध्ये पुढीलप्रमाणे लक्षणे आढळतात. ताप, घसादुखी, घशाला खवखव, खोकला, नाक गळणे (सर्दी), अंगदुखी, डोकेदुखी, इतर कोणतेही निदान झालेले नसणे. बालरुग्णांमध्ये सौम्य ते मध्यम स्वरुपाचा ताप आढळतो. घसादुखी असणाऱ्या बाळामध्ये तोंडातून अतिप्रमाणात लाळ गळताना आढळते. काही रुग्णांना जुलाब उलट्या होतात. प्रतिकार शक्ती कमी असणाऱ्या व्यक्तींमध्ये अनेक वेळा ताप आढळत नाही.

       अतिजोखमीच्या व्यक्तीमध्ये इन्फ्लूएंझा एच3 एन2 विषाणु हा खालील दिलेल्या व्यक्तींमध्ये गंभीर स्वरुप धारण करु शकतो :- इन्फ्लूएंझाची लागण कुठल्याही वयाच्या व्यक्तीला होऊ शकते. मात्र या आजाराचा धोका 5 वर्षाखालील मुले (विशेषकरुन 1 वर्षाखालील बालके), 65 वर्षावरील वरिष्ठ नागरिक, गरोदर माता, उच्च रक्तदाब किंवा इतर ह्दयरोग. फुप्फुस, यकृत, मुत्रपिंड, चेता संस्थेचे विकार यांचे आजार असणाऱ्या व्यक्ती. प्रतिकार शक्तीचा ऱ्हास झालेली व्यक्ती. दीर्घ स्टिरॉईड औषधे घेणाऱ्या व्यक्तींना या आजाराचा धोका जास्त होऊ शकतो. हा संसर्गजन्य आजार असल्याने एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला होऊ शकतो. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अमरीश मोहबे यांनी दिली.

       निकट सहवासीतांचा शोध व उपचार :- इन्फ्लूएंझा अधिशयन कालावधी हा 1 ते 7 दिवसांचा आहे. इन्फ्लूएंझा एच3 एन2 रुग्णांमध्ये लक्षणे आढळून येण्याच्या एक दिवस आधीपासून ते लक्षणे आढळल्यानंतर पुढील सात दिवसांपर्यंत इन्फ्लूएंझा एच3 एन2 बाधित रुग्णांच्या प्रत्यक्ष सहवासात आलेल्या निकट सहवासितांचा शोध घेणे आवश्यक असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन वानखेडे यांनी दिली.

         निकट सहवासित कोणास म्हणावे :- बाधित रुग्णाच्या संसर्गजन्य कालावधीत रुग्णाच्या 6 फुटापेक्षा जवळ सहवासात आलेल्या व्यक्तीस निकट सहवासित म्हणावे.

         प्रयोगशाळा चाचणी :- संशयीत फ्यू रुग्णांचा कोविड प्रमाणे नाक अथवा घशातील स्त्रावाचा स्वॉब तपासणी करण्यात येतो.

        इन्फ्लूएंझा स्वाईनफ्लू टाळण्यासाठी हे करा :- शिंकताना आणि खोकताना नाक आणि तोंड झाका. आपले हात वारंवार साबण व स्वच्छ पाण्याने धुवा. पौष्टिक आहार घ्या. लिंबू, आवळा, मोसंबी, संत्री, हिरव्या पालेभाज्या या सारख्या आरोग्यदायी पदार्थाचा आहारात समावेश करा. धुम्रपान टाळा. पुरेशी झोप आणि विश्रांती घ्या. भरपूर पाणी प्या. विलगीकरण राहा.

    इन्फ्लूएंझा फ्लू टाळण्यासाठी हे करु नका :- हस्तांदोलन करणे टाळा. आपले डोळे, नाक किंवा तोंडाला स्पर्श करणे टाळा. टिश्यु पेपरचा पुनर्वापर टाळा. सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध घेऊ नका. आपल्याला फ्लू सदृश्य लक्षणे असतील तर गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका.

Exit mobile version