शेतकरी बंधुनो कृषी महोत्सवाला अवश्य भेट द्या – जिल्हाधिकारी

0
25

· जिल्हा कृषी महोत्सव २३ मार्चपासून

         गोंदिया, दि.23 : शेतीमधील नवीन प्रयोग, शेतकरी यशोगाथा, नवीन तंत्रज्ञान थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावे व शेतीत होणाऱ्या नवनवीन प्रयोगाची माहिती मिळावी यासाठी २३ मार्च ते २७ मार्च दरम्यान गोंदिया येथे जिल्हास्तरीय कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी या महोत्सवाला अवश्य भेट दयावी, असे आवाहन जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी केले आहे.

         कृषी विभाग, कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने २३ ते २७ मार्च दरम्यान  मोदी मैदान, बालाघाट टी पॉईंट जवळ, गोंदिया येथे जिल्हा कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

         सदर महोत्सवात कृषी प्रदर्शन, उत्पादक ते थेट ग्राहक विक्री, चर्चासत्र व परिसंवाद, शेतकरी सन्मान समारंभ, महिला बचतगट निर्मिती वस्तुंचे प्रदर्शन व विक्री आणि सांस्कृतिक कार्यक्रम ही महोत्सवाची वैशिष्टये आहेत. या महोत्सवात सेंद्रिय पद्धतीने उत्पादीत केलेले सुगंधीत तांदुळ, गोंदिया जिल्हयाचे परंपरागत वाणाचे, कडधान्य, डाळी, गुळ व हळद आदी अन्नधान्य विक्रीसाठी उपलब्ध राहणार आहेत. त्याचप्रमाणे कलात्मक वस्तु, खाद्य पदार्थ आणि बचतगटांनी तयार केलेल्या गृहपयोगी वस्तूंचे स्टॉल राहणार आहेत.

       या महोत्सवात दुग्ध व्यवसाय, मत्स्य व्यवसाय, भाजीपाला, धानावरील प्रक्रिया उद्योग, रेशीम उद्योग, पशुखाद्य, शेती अवजार, नाबार्ड व बँकेचे स्टॉल प्रामुख्याने असणार आहेत. शेतकऱ्यांना नविन तंत्रज्ञानाची माहिती व्हावी यासाठी विविध विषयावरील परिसंवाद व चर्चासत्राचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच पौष्टिक तृणधान्य कार्यशाळा, पाककला स्पर्धा व प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेअंतर्गत खरेदीदार विक्रेता संमेलन, समुदाय आधारीत संस्थेचे एकत्रीकरण व संवेदीकरण कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे.

        जिल्ह्यात उत्कृष्ट शेती व पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांचा या महोत्सवात सत्कार केला जाणार आहे. याशिवाय शासनाच्या विविध विभागाच्या योजनांची माहिती देणारे स्टॉल या प्रदर्शनीत लावण्यात येणार आहेत. सदर प्रदर्शनी सकाळी 10 ते रात्री 9 वाजेपर्यंत सर्वांसाठी नि:शुल्क खुले राहणार आहे.

        तरी जिल्ह्यातील शेतकरी बांधव, ग्राहक, गृहिणी, शालेय विद्यार्थी-विद्यार्थींनी व नागरिकांनी सदर कृषी महोत्सवास अवश्य भेट देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी केले आहे.