शेतकऱ्यांनी कृषी महोत्सवातून नवीन तंत्रज्ञान घेऊन जावे- जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे

0
10

* कृषी महोत्सवाचा समारोप

* प्रगतशील शेतकऱ्यांचा सत्कार

          गोंदिया, दि.27 : पारंपरिक पद्धतीने शेतीमध्ये उत्पन्न घेण्यास मर्यादा येतात. मात्र नवनव्या प्रयोगासोबतच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रयोगशील शेती केल्यास उत्पन्नात वाढ होऊ शकते. ही बाब लक्षात घेता शेतकऱ्यांनी या कृषी महोत्सवातून आधुनिक तंत्रज्ञान समजून घेऊन आपल्या शेतात त्याचा वापर करावा व शेती उत्पन्नात वाढ करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी केले. महिला व बाल विकास विभागाअंतर्गत महिला आर्थिक विकास महामंडळ व कृषी विभागाच्या वतीने आयोजित गोंदिया जिल्हास्तरीय कृषी महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमात ते बोलत होते.

         मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल पुंड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हिंदुराव चव्हाण, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी संजय संगेकर, कृषी उपसंचालक प्रणाली चव्हाण, जिल्हा माहिती अधिकारी रवि गिते, कृषी विज्ञान केंद्राचे डॉ.सय्यद शाकिर अली व माविमचे सहाय्यक जिल्हा समन्वय अधिकारी सतीश मार्कंड प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

         कृषी महोत्सवात विविध प्रकारचे एकूण १५० स्टॉल लावण्यात आले होते. एकात्मिक शेती प्रणाली, पौष्टिक तृणधान्य, हरितगृह, पॉली हाऊस, सामूहिक शेततळे, शेंद्रिय शेती, काळा तांदूळ, मका शेती, शेती उपयोगी औजारे, शेंद्रिय भाजीपाला, स्ट्राबेरी, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या महिला बचत गट उत्पादित उत्पादने, महिला व बाल विकास विभागाच्या विविध योजनांची माहिती, मत्स्यव्यवसाय, विधी सेवा प्राधिकरण, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, बियाणे, यंत्र, बचतगटाने तयार केलेले खाद्य पदार्थ, आरोग्य, चाईल्ड लाईन आदी स्टॉलचा यात समावेश होता.

        या महोत्सवात पाचही दिवस शेतकऱ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले करण्यात आले. २४ मार्च रोजी पौष्टिक तृणधान्य कार्यशाळा, २५ मार्चला प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेअंतर्गत खरेदीदार विक्रेते संमेलन, स्मार्ट प्रकल्पाअंतर्गत कार्यशाळा, २६ मार्च रोजी विविध विषयांवर मार्गदर्शन व चर्चासत्र आणि २७ मार्च रोजी कृषी पुरस्कार प्राप्त शेतकरी, प्रगतशील शेतकरी, उत्कृष्ट काम करणारे अधिकारी कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले की, 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. त्या अनुषंगाने विविध प्रथिने व पौष्टिकमूल्य असलेल्या पालेभाज्या, तृणधान्य, दुग्धजन्य पदार्थ व फळे अंतर्भूत असावे. शेतकऱ्यांनी शेती सोबतच एखादा पुरक जोडधंदा करावा जेणेकरून उत्पन्नात वाढ होईल.

         शेतीमध्ये होणाऱ्या प्रगतशील व यशस्वी प्रयोगाचे शेतकऱ्यांनी अनुकरण करावे असे सांगून अनिल पाटील म्हणाले की, निकोप व निरोगी आरोग्यासाठी उपयुक्त असणाऱ्या सेंद्रिय शेतीकडे शेतकऱ्यांनी वळावे. कर्करोग होणार नाही या अनुषंगाने शेतपिक विकसित करणे काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. हा महोत्सव नवीन तंत्रज्ञानाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असणार आहे असेही ते म्हणाले.

       यावेळी वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्काराचे वितरण मान्वरांच्या हस्ते करण्यात आले. कृषी विभागात उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच तिरंगा थाळी व सकस आहार या स्पर्धेतील विजेत्या महिलांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.

       प्रास्ताविक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा प्रकल्प संचालक आत्मा हिंदुराव चव्हाण यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मंडळ कृषी अधिकारी नंदू वानखेडे व माविमचे प्रफुल अवघड यांनी केले तर उपस्थितांचे आभार माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी संजय संगेकर यांनी मानले. कार्यक्रमास शेतकरी, बचतगटातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.