Home विदर्भ धानोली रेल्वेस्थानकाचे काम संथगतीने

धानोली रेल्वेस्थानकाचे काम संथगतीने

0

सालेकसा- तालुक्यातील धानोली रेल्वेस्थानकात विकासकामे गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहेत. ही कामे अतिशय संथगतीने सुरू असून प्रवाशांना जीव मुठीत घेऊनच बोगीत चढावे-उतरावे लागते. दरम्यान, संबंधित विभागाने ताबडतोब कामे पूर्ण करावीत, अशी मागणी होत आहे. विद्यार्थ्यांसह शहरी भागात कामानिमित्त जाणार्‍या नागरिकांना धानोली रेल्वेस्थानकातून दररोज ये-जा करावी लागते. परंतु, रेल्वेस्थानकातील विकासकामे गेल्या दीड वर्षांपासून संथगतीने सुरू असल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
काही दिवसांपूर्वीच या रेल्वेस्थानकावर एका महिलेचा अपघात होता होता टळला. धानोली, दरबडा, घोन्सी, पिपरटोला, मरारटोला, बोदलबोडी, भजेपार, नानव्हा, बाम्हणी व चिचटोला येथील प्रवासी या रेल्वेस्थानकातून नेहमी प्रवास करीत असतात. उल्लेखनीय म्हणजे, या रेल्वेस्थानकावर वीज, पाणी, फलाटावर खुच्यार्ची व्यवस्था नाही. दरम्यान, मुलभूत सुविधांसह कामे जलदगतीने करावी, अन्यथा रेल्वे रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा प्रवाशांनी दिला आहे.

धानोली रेल्वेस्थानकात गेल्या दीड वर्षांपासून विकासकामे सुरू आहेत. ही कामे अतिशय संथगतीने सुरू असून, प्रवाशांना प्रचंड त्रास होत आहे. ही समस्या दूर करावी. तसेच दुपारी गोंदिया व डोंगरगडकडे जाणायेण्याकरिता रेल्वे नाही. त्यामुळे दुपारची पॅसेंजर गाडी सुरू करावी, अशी मागणी रेल्वेच्या अधिकार्‍यांकडे करणार असल्याचे दरबडाचे सरपंच तमिलकुमार टेंभरे यांनी सांगितले.

Exit mobile version