Home विदर्भ आयुक्तांनी केली मान्सुनपुर्व नाले स्वच्छता मोहीमेची पाहणी  

आयुक्तांनी केली मान्सुनपुर्व नाले स्वच्छता मोहीमेची पाहणी  

0

कामाला वेग देण्याचे निर्देश

चंद्रपूर १६ मे – चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या वतीने मान्सूनपूर्व नाले स्वच्छता अभियान राबविण्यात येत असुन सदर मोहीमेची आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल यांनी प्रत्यक्ष पाहणी केली.
पाहणीदरम्यान आयुक्तांनी स्वच्छतेचे काम करणाऱ्या कंत्राटदाराला वेळेत काम करण्याची सक्त ताकीद दिली तसेच वेळप्रसंगी अतिरिक्त मशीन लावुन काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले. यावर्षी पावसाळा नेहमीपेक्षा उशीरा सुरु होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला असला तरी हवामान बदलांमुळे ठिकठिकाणी अवकाळी पाऊस पडत असल्याचे लक्षात घेऊन महापालिका आयुक्त विपीन पालीवाल यांच्या मार्गदर्शनानुसार पावसाळापूर्व गटार सफाई कामे लवकरच एप्रिल महिन्यापासुन सुरु करण्यात आलेली आहेत.
सफाई मोहिमेवर अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील व उपायुक्त अशोक गराटे लक्ष ठेवून असुन ८८ सफाई कर्मचारी, ३ जेसीबी, २ पोकलेन, गाळ वाहतुकीसाठी ५ ट्रॅक्टरद्वारे नैसर्गिक मोठ्या नाल्यांच्या साफसफाईची कामे तसेच बंदिस्त गटारे साफसफाईची कामे करण्यात येत आहेत.
नाले स्वच्छता अभियानाअंतर्गत नाल्यांची रूंदी व खोली पूर्णपणे स्वच्छ करून पावसाळी पाणी वाहण्याकरिता सुरळीत प्रवाह करण्यात येत असुन याद्वारे वाहणाऱ्या पाण्याची क्षमता वाढेल आणि नाल्यांच्या काठावर असलेल्या वस्त्यांत पावसाळ्यात येणाऱ्या पूरापासून सुरक्षा प्रदान होईल. शहरातील मोठ्या नाल्यांची तसेच लहान नाल्यांची साफ सफाई सुरू असून, मनुष्यबळ व जेसीबीच्या मदतीने गाळ आणि कचरा बाहेर काढण्यात येत आहे. तसेच नाल्याभोवती वाढलेली झाडेझुडपी व नाल्यातील दगड बाहेर काढून सांडपाण्याला वाट काढून दिली जात आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version