Home विदर्भ निती आयोगाच्या माध्यमातून 12 तलावातून काढला 2 लक्ष 90 हजार घनमीटर गाळ

निती आयोगाच्या माध्यमातून 12 तलावातून काढला 2 लक्ष 90 हजार घनमीटर गाळ

0

67 तलावातून 6 लक्ष 67 हजार घनमीटर गाळ काढण्याचे नियोजन

       वाशिम, दि. 27 : जिल्हयात सिंचनाचे क्षेत्र कमी आहे. जिल्हयातील बहुतांश शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहून केली जाते. जिल्हयात सिंचनाच्या व्यवस्थेसाठी असलेल्या सिंचन प्रकल्पात मोठया प्रमाणात गाळ साचला असल्याने या प्रकल्पाची पाणी साठवण क्षमता कमी झाली आहे. निती आयोगाच्या माध्यमातून 10 हेक्टर क्षमतेच्या जिल्हा परिषदेच्या जलसंधारण विभागाच्या अधिनस्त असलेल्या तलावातील गाळ काढण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. आतापर्यंत 12 तलावातून 2 लक्ष 90 हजार घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. 67 तलावातून 6 लक्ष 67 हजार घनमीटर गाळ काढण्याचे नियोजन आहे.

         तलावातून गाळ काढण्याच्या कार्यक्रमातून शेतकऱ्यांना सुपीक गाळ शेतात टाकण्यासाठी उपलब्ध होत आहे. शेतात गाळ टाकल्याने शेतातील पिकांची उत्पादन क्षमता वाढण्यास मदत होणार आहे. गाळ टाकल्यामुळे जमीन सुपीक होणार आहे. ज्या तलावातून गाळ काढण्यात येणार आहे, त्या तलावाची पाणी साठवण क्षमता पुनर्स्थापित होणार आहे. सोबतच त्या तलाव परिसरातील भूजल पातळी वाढणार आहे. जलस्त्रोतांच्या पातळीत देखील वाढ होणार आहे.

         निती आयोगाने जिल्हयाचे मागासलेपण ओळखून जिल्हयाचे समावेश आकांक्षीत जिल्हयात केला आहे. मागासलेपण दूर करण्यासाठी जिल्हयातील शेतीची उत्पादन क्षमता वाढावी तसेच विविध प्रकारची जलसंधारणाची कामे जिल्हयात व्हावी. यासाठी निती आयोग आग्रही आहे. कृषी व जलसंधारण क्षेत्रात मागील वर्षी जिल्हयात चांगले काम झाले आहे. ही बाब लक्षात घेवून यावर्षी सुध्दा निती आयोगाने जलसंधारणाच्या कामासाठी निधी उपलब्ध करुन दिला आहे.

         जिल्हयातील 10 हेक्टरपर्यंतच्या तलावातील गाळ काढण्यात येत आहे. जिल्हा परिषदेच्या जलसंधारण विभागाने 67 तलावातून 6 लक्ष 67 हजार घनमीटर गाळ काढण्याचे नियोजन केले आहे. आतापर्यंत 12 तलावातून 2 लक्ष 90 हजार घनमीटर गाळ काढला आहे. या तलावातून गाळ काढण्याचे काम संपले आहे. या 12 तलावामध्ये रिसोड तालुक्यातील कोयाळी, वाशिम तालुक्यातील किनखेड, झोडगा, पांगरखेडा, कृष्णा, कारंजा तालुक्यातील कामरगांव, मानोरा तालुक्यातील सोमनाथनगर, मालेगांव तालुक्यातील उडी व अमानी आणि मंगरुळपीर तालुक्यातील चिखलगड, वनोजा व बेलखेड येथील तलावांचा समावेश आहे. सद्यस्थितीत जिल्हयात 38 तलावातून गाळ काढण्याचे काम सुरु आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version