पुतळी,कोयलारी येथे विविध विकासकामांचा भूमिपूजन

0
16

सडक अर्जुनी : राज्य सरकार तर्फे गोंदिया जिल्ह्यात बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरु करण्यात आलेला असून प्रत्येक तालुक्यात एक दवाखाना सुरु करण्यात आलेला आहे. यात दुपारी २ ते रात्री १० वाजेपर्यंत निशुल्क सेवा दिली जात असून बाह्यरुग्ण सेवा, औषधोपचार, तपासणी, कंसल्टेशन, गर्भवती मातांची तपासणी आणि लसीकरण केले जात आहे. तसेच महिन्याच्या निश्चित दिवशी निशुल्क नेत्र तपासणी, रक्त तपासणी, मानसिक आरोग्य तपासणी व आवश्यकतेनुसार तज्ञ डॉक्टरांची ची सेवा दिली जाणार आहे. आता पर्यंत २००० नागरिकांनी या सेवेचा लाभ घेतला असून आपण देखील घ्यावा असे आवाहन राज्याचे माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी केले आहे. ग्राम पुतळी,कोयलारी ता.सडक अर्जुनी येथे विविध विकासकामांच्या भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. लेखाशीर्ष २५-१५ अंतर्गत रू.२५ लक्ष निधीतून सांस्कृतिक भवन, गणेश मंदिर परिसरात पेव्हर ब्लॉक बसवणे, पाण्याचा निचरा व्यवस्थित व्हावा यासाठी नाली बांधकाम, ग्रामपंचायत जनसुविधा अंतर्गत सिमेंट रस्ता बांधकाम इत्यादी कामे करण्यात येणार आहे. दरम्यान माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी उपस्थित ग्रामस्थांसोबत चर्चेच्या माध्यमातून समस्या जाणून घेतल्या तसेच केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती सुद्धा दिली.

याप्रसंगी पंचायत समिती सदस्य दिपालीताई मेश्राम,जिवन लंजे, ललित डोंगरवार, ग्रामपंचायत पुतळी सरपंच राजेंद्र राऊत, ग्रामपंचायत कोयलारी सरपंच रजनीकांत वालदे, उपसरपंच रवींद्र कापगते, राकेश मुंगमोडे, तंटामुक्ती अध्यक्ष डॉ.खोब्रागडे, ग्रामपंचायत सदस्य लताबाई सलामे, लताबाई कापगते, अनिताताई खंडाते, प्रकाश पंधरे,सर्वानंद मांढरे, मंगलाताई नंदेस्वर,रामकृष्ण कापगते, रमेश राऊत, पुरणलालजी शेंद्रेसह मोठ्या संख्येने  ग्रामस्थ उपस्थित होते.