– जिवनोपयोगी वस्तु व शालेय साहित्याचे वाटप
अर्जुनी मोर.-जन्मदात्या आई-वडिलांचे छत्र हिरावलेल्या गोंडस, निरागस मुलांनी एकटेपणाची भावना स्वतःमध्ये ठेवू नये. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून जो प्रगतीमय जीवनाचा मार्ग मिळतो तोच खरा अप्रतिम आनंदाचा क्षण ठरतो. प्रगतीचे यशोशिखर गाठण्यासाठी खडतर प्रवास लागणार आहे. मदत आम्ही करू, तुम्ही शिक्षणाची पायरी गाठा यातच तुमचे कल्याण आहे. मनात प्रबळ इच्छाशक्ती अंगीकृत करून स्वतःचे जीवन उज्वल करण्याची खूणगाठ बांधा असे आवाहन अनाथांची माय प्रा. डॉ. सविता बेदरकर यांनी केले.
अर्जुनी मोर. तालुक्यातील बोंडगाव देवी ग्रामपंचायतच्या सभागृहात 27 ऑगस्ट रोजी तालुक्यातील अनाथ मुलांना अन्नधान्य, जीवनोपयोगी वस्तू, शालेय साहित्य वाटप प्रसंगी त्या बोलत होत्या. स्थानिक सामाजिक कार्यकर्ते अमरचंद ठवरे यांच्या सामाजिक कार्य शैलीने गोंदियांच्या पहांदी पारो कुपार लिंगो बहुउद्देशीय संस्थेच्या मदतीने आयोजित अनाथांना अन्नधान्य वाटप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच प्रतिमा बोरकर होत्या. प्रमुख मार्गदर्शक म्हणून समाजशील शिक्षक अनिल मेश्राम, तलाठी भगवान नंदागवळी, डॉ. श्यामकांत नेवारे, प्राचार्य विलास खंडाईत, सामाजिक कार्यकर्ते धनेंद्र भुरले, अमरचंद ठवरे ,आनंद बोरकर उपस्थित होते. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील अनाथ मुलांना समाजातील दानदात्यांकडून आर्थिक पाठबळ मिळावे. त्यांच्या दैनंदिन जीवनात जन्मदात्यांची उणीव भासता कामा नये. अनाथांच्या चेहऱ्यावर सदैव हास्याची आनंदाची झळाळी कायम राहावी. शिक्षणात खंड पडू नये यासाठी त्यांच्या घरी जाऊन वास्तव परिस्थितीचे चित्रण वेळोवेळी वर्तमानपत्रातून मांडून मदतीचे आवाहन केले जाते. सामाजिक कार्याचा वसा अंगी कारणाऱ्या अनाथाची माय डाॅ. सविता बेदरकर नेहमीच अनाथांच्या मदतीसाठी धावून येतात. यावेळी त्यांनी तांदूळ, गहू, तेल, मिरची, हळदी, साबण, शालेय साहित्य मुलींना लागणारे सर्व साहित्य दिले. यावेळी या अनाथ मुलांना ग्रामपंचायत कार्यालयात साहित्य वाटप करण्यात आले. पुढे प्रा. बेदरकर म्हणाल्या जिवनोपयोगी गरजा भागविण्यासाठी सामाजिक दानदात्यांसमोर पदर पसरण्यास मला कमीपणा येणार नाही. परंतु पुढे येणाऱ्या दिवसात तुमच्या जीवनाचे प्रगतीमय सार्थक करणे तुमच्या हातात आहे उरासी ध्येय बाळगा, शिक्षणाची कास धरा, कठीण प्रसंगातही शिक्षण सोडू नका .शिक्षणामुळे तुमच्या जीवनात निश्चितपणे आकाशाला आसेची गवसणी घालण्याचा योग येईल. प्रगतीची वाट मिळेल,सुखी जीवनात रममान होणार असा आशावाद त्यांनी व्यक्त केला यावेळी दानदात्यांकडून मिळालेल्या मदतीचे वाटप निमगाव, बाकटी, वडेगाव, मांडोखाल, बोंडगाव देवी, खामखुरा, ताळगाव येथील अनाथ मुलांना करण्यात आले. याप्रसंगी मुलांसाठी बोंडगाव देवी जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य विलास खंडाईत यांच्याकडून अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती. कार्यक्रमाचे संचालन व आभार अमरचंद ठवरे यांनी मानले. यशस्वीतेसाठी कर्मचारी राष्ट्रापाल ठवरे .भोजराम मेश्राम.तुफान लोणारे यांनी सहकार्य केले.