वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दुर्गम भागात मुलांसोबत साजरे केले रक्षाबंधन

0
9

गडचिरोली : जिल्ह्यातील नक्षलग्रस्त व अतिदुर्गम, आदिवासीबहुल भाग म्हणून ओळखल्या जाणा­ऱ्या हेडरी उपविभागातील पोलीस मदत केंद्र गट्टा (जांबिया) येथे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी महिला पोलिस अंमलदारांचे मनोबल वाढविण्यासाठी रक्षाबंधनाचा सण साजरा केला. यावेळी महिला पोलीस अंमलदारांसह जिल्हा परिषद डिजीटल शाळा जाजावंडी येथील विद्यार्थिनींनी रक्षाबंधनाच्या उपक्रमात सहभाग घेऊन सर्व पोलिस अधिकारी व अंमलदारांना राखी बांधली.

पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी शुभेच्छा देताना सांगितले की, गडचिरोली पोलिस दलात दुर्गम भागात काम करणाऱ्या महिला पोलिस अंमलदार नागरिकांची सुरक्षा आणि माओवादविरोधी अभियानामध्ये अग्रस्थानी राहतात. अनेक वेळा कर्तव्यामुळे हा सण त्यांना ठाण्यातच साजरा करावा लागतो. त्यांना कुटुंबातील कार्यक्रमात सहभागी होता येत नाही. कर्तव्याला प्रथम प्राधान्य देणाऱ्या या महिला पोलिस अंमलदारांसोबत हा रक्षाबंधनाचा सण आम्हाला साजरा करता आला याचा आनंद आहे, असे म्हणत त्यांनी उपस्थित सर्वाना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या.

यासोबतच खडतर सेवा देणारे सी-60 चे जवान अतिसंवेदनशील भागात सेवा देत असताना आपल्या कुटुंबीयांसोबत रक्षाबंधन सण साजरा करु शकत नाहीत. त्यामुळे सी-60 च्या अधिकारी व अंमलदार यांना फुले-आंबेडकर कॉलेज ऑफ सोशल वर्क, गडचिरोलीच्या विद्यार्थिनी व प्राध्यापिका वनमाला माळी यांनी विशेष अभियान पथक कार्यालयात राख्या बांधून रक्षाबंधन सण साजरा केला.

याप्रसंगी पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, अपर पोलिस अधीक्षक अहेरी यतिश देशमुख, यांच्यासह सीआरपीएफचे असिस्टंट कमांडन्ट मोहित कुमार, पोमकें गट्टा (जां.)चे प्रभारी अधिकारी चेतन परदेशी, जाजावंडी शाळेचे मुख्याध्यापक बेडके तसेच पोलीस अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.