राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानात नाविन्यपूर्ण संकल्पना राबवा- जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे

0
10

. अभियान आढावा बैठक

२० ऑगस्ट ते  ऑक्टोबर अभियान कृती कालावधी

        गोंदिया, दि.7 : राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान व स्पर्धा २०२३-२४ मध्ये सर्व शासकीय विभागाने सहभागी होणे अपेक्षित आहे. अभियान व स्पर्धेशी संबंधित सर्व अनुषंगिक बाबींवर कार्यवाही करण्यासाठी शासनाने पोर्टल विकसित केले आहे. जिल्ह्यातील सर्व शासकीय विभागांनी नाविन्यपूर्ण कल्पना राबवून राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानात सहभागी व्हावे, अशा सूचना जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी केल्या.

          सदर अभियानाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते. या संबंधीचे प्रस्ताव व आराखडा तातडीने सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व विभाग प्रमुखांना दिले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे, अधिष्ठाता डॉ.कुसुमाकर घोरपडे, सर्व उपविभागीय अधिकारी व गटविकास अधिकारी यांचेसह सर्व विभागाचे कार्यालय प्रमुख उपस्थित होते.

          राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान कृती कालावधी २० ऑगस्ट ते २ ऑक्टोबर २०२३ असा आहे. स्पर्धेसाठी विचारात घ्यावयाचा कालावधी मागील २० ऑगस्ट २०२२ ते १९ ऑगस्ट २०२३ असा आहे. प्रशासकीय सुधारणेविषयी प्रस्ताव व कल्पना यासाठी मात्र कालावधीची अट नसेल असे त्यांनी नमूद केले.

         या अभियानांतर्गत शासनाने सात कार्यक्षेत्र निश्चित केली आहेत. कार्यालयीन व्यवस्थापनामध्ये आधुनिक संकल्पना व व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब, सेवांची गुणवत्ता/ दर्जा यामधील वाढ व उपक्रमांची परिणामकारकता, लोकाभिमुखता, ई-गव्हर्नस, संसाधनांचा पर्याप्त व प्रभावी वापर, तंटा/ तक्रार मुक्त कार्यालय, नाविन्यपूर्ण व पथदर्शी स्वरूपाच्या संकल्पना, प्रयोग व उपक्रम ही ती सात कार्यक्षेत्र आहेत असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

         या स्पर्धेच्या निमित्याने जिल्ह्यातील सर्व यंत्रणेच्या कारभारात अधिक गतिमानता आणण्याच्या दृष्टीने चालना मिळणार आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुख व खातेप्रमुख यांनी आपल्या खात्याच्या कारभार जास्तीत जास्त लोकाभिमुख तसेच तत्पर व कार्यक्षम होण्याच्या दृष्टीने स्पर्धेच्या कालावधीत व त्यानंतरच्या कालावधीत प्रयत्न करावा. सभेच्या निमित्ताने आपल्या खात्यातील सर्व अधिकारी व सेवकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण करून उद्देश साध्य करण्यासाठी वातावरण निर्माण करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

        स्पर्धेसाठी https://pragatiabhiyan.maharashtra.gov.in/ या पोर्टलवर जावून आपली नोंदणी करणे अनिवार्य राहिल. आपले युजर नेम व पासवर्ड जतन करून ठेवण्यात यावे. शासनाच्या स्पर्धेच्या अनुषंगाने आपल्या खात्यामध्ये कोणत्या प्रकारे कार्यवाही करणार आहात याचा तपशीलवार आराखडा सादर करणे अपेक्षित आहे. त्यानुसार आपल्या विभागाकडील तयार केलेल्या आराखड्याची प्रत जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करणे अनिवार्य राहिल असे ते म्हणाले.

        स्पर्धेच्या तयारीसाठी कालावधी अत्यंत कमी असल्यामुळे आपल्या विभागाकडील आराखडा सत्वर तयार करण्यात यावा. शासनाच्या या स्पर्धे संबंधीचा 03 फेब्रुवारी 2021 चा सामान्य प्रशासन विभागाचा शासन निर्णय अभ्यासावा व गोंदिया जिल्ह्यातील जास्तीत जास्त कार्यालयांनी या अभियानांतर्गत स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

        प्रशासन लोकाभिमुख करणे, त्यात निर्णयक्षमता आणणे आणि सर्वांच्या सहकार्यातून उत्तम प्रशासन कार्यान्वित करणे हा या अभियानाचा उद्देश आहे. या अभियानांतर्गत घ्यावयाच्या स्पर्धेच्या निवड प्रक्रियेसाठी 4 स्तरांवर अनुक्रमे तालुका स्तर, जिल्हा स्तर, विभागीय स्तर व राज्यस्तर अशा समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. या अभियानांतर्गत अर्ज स्विकारण्यासाठी राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा पोर्टल विकसीत करण्यात आले असून सदर संकेतस्थळाची लिंक https://pragatiabhiyan.maharashtra.gov.in/ अशी आहे. सदर अभियानांतर्गत घेण्यात येणाऱ्या स्पर्धेसाठी 16 ते 31 ऑक्टोंबर 2023 दरम्यान ऑनलाईन प्रस्ताव सादर करावयाचे आहे. आपल्या कार्यालयाच्या नाविन्यपूर्ण संकल्पना सूचविण्यासाठी  तालुका स्तर प्रथम पारितोषिक 30 हजार रुपये, द्वितीय 20 हजार रुपये व तृतीय 10 हजार रुपये. जिल्हा स्तर प्रथम पारितोषिक 75 हजार रुपये, द्वितीय 50 हजार रुपये व तृतीय 25 हजार रुपये. विभागीय स्तर प्रथम पारितोषिक 1 लाख 50 हजार रुपये, द्वितीय 1 लाख रुपये व तृतीय 50 हजार रुपये. राज्यस्तर प्रथम पारितोषिक 10 लाख रुपये, द्वितीय 6 लाख रुपये व तृतीय 4 लाख रुपये अशाप्रकारे पारितोषिक देण्यात येणार आहे. गोंदिया जिल्ह्यातील जास्तीत जास्त कार्यालयांनी या अभियानांतर्गत स्पर्धेत सहभागी होवून आपल्या विभागातील नाविण्यपूर्ण संकल्पना सादर करावे, असे निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे यांनी सांगितले.

        जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक हरिचंद्र पौनीकर यांनी राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धेबाबत पॉवरपॉईंट सादरीकरणाद्वारे विस्तृत माहिती विशद केली.